Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Satara › ‘पोस्टर बॉइज’ पोलिस पाटील मंडळींवर कारवाईची मागणी

‘पोस्टर बॉइज’ पोलिस पाटील मंडळींवर कारवाईची मागणी

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 8:54PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 

गेल्या महिन्यात पाटण तालुक्यात अनेक पोलिस पाटील पदांच्या शासकीय नेमणूका पार पडल्यावर याबाबतचे गावोगावी भलेमोठे पोस्टर्स, होर्डिग्जही लागले. ज्यांच्या हातात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही पदे देऊन त्यांचा सन्मान केला त्यांनी पहिल्याच झटक्यात जाहीरपणे कायदा मोडीत काढला. आता या निवडींना अनेक दिवस उलटून गेले मात्र तरीही या ‘पोस्टर बॉइज ’ पोलिस पाटलांची प्रसिद्धीची हाव काही थांबेना. त्यामुळे आता पोलिस व महसूलच्या वरिष्ठांनीच या पोस्टर बॉइजवर कायदेशीर कारवाई करून त्यांना झटका द्यावा, असे सामाजिक मत बनले आहे. 

मागील महिन्यात पाटण तालुक्यात बहुतांशी गावात या पोलिस पाटील पदांच्या अधिकृत नेमणूका प्रशासनाकडून करण्यात आल्या. या नेमणूका होताच पहिल्यांदा एक दोन ठिकाणी यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले. मात्र अल्पावधीतच ही फॅशन गावागावात आणि गल्लीबोळातही पसरली व शेकडो बॅनर, होर्डिग्ज सगळीकडेच पहायला मिळाले. याबाबत कोणीच कोणतीच कारवाई न केल्याने मग हे पेव कमी होण्यापेक्षा वाढतच गेले.  शासकीय मानधन असणार्‍या याच पोलिस पाटील मंडळीना अशा प्रकारे जाहीर जाहिरात करणे हे देखील कायद्याचे उल्लंघन व यावर कारवाईही होऊ शकते. या बाबी असतानाही येथे मात्र अभिनंदनाच्या नावाखाली उघडपणे कायद्याची पायमल्ली होताना सगळेच गप्प का ? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर इतरांनी असे कोणतेही बेकायदेशीर, अनुचित प्रकार केल्यास याची ताबडतोब माहिती संबंधित विभागांना देणे हे याच पोलिस पाटील मंडळीना बंधनकारक आहे. मात्र तेच अथवा त्यांचे समर्थकच जर कायदा मोडत असतील तर आता याबाबत वरिष्ठांनीच लक्ष घालावे.रस्त्यावरील वाळूच्या अथवा गौणखनीज वाहतूकीवर महसूल व पोलिस यंत्रणेचा नेमका डोळा असतो. मात्र अशा पोस्टर बॉइज पोलिस पाटील मंडळींकडे कानाडोळा का ? हा संशोधनाचा विषय असल्याचे मत नागरीकांमधून व्यक्त केले जात आहे.