होमपेज › Satara › पोलिसदादाला साजरा करायचाय बेंदूर

पोलिसदादाला साजरा करायचाय बेंदूर

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:52PMसातारा : प्रतिनिधी

शेतकार्‍यांच्या सर्जा-राजाचा महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर हा सण होय. पोलिस दलात काम करणार्‍या एका पोलिसाने अगदी निष्पापपणे चक्क पोलिस अधिकार्‍याकडे बेंदूर साजरा करण्यासाठी रजा मागितली. मात्र मराठा व वाहतूकदार आंदोलन असल्याने पोलिसाला सुट्टी नाकारण्यात आली. असे असले तरी त्या पोलिसदादाला बेंदूर साजरा करण्यासाठी एक तासाच्या सुट्टीची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसाने केलेला हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांमधील पारंपारीक सणाबाबतची भावना यानिमित्ताने समोर आली आहे.

त्याचे असे झाले, मेढा पोलिस ठाण्यांतर्गत कुडाळ दुरक्षेत्र आहे. या दुरक्षेत्रामध्ये पोलिस दलात नव्यानेच रुजू झालेले पोलिस कर्मचारी ए. टी.जाधव कर्तव्य बजावत आहेत. पोलिस कर्मचारी जाधव यांनी मंगळवारी एक अर्ज टाईप करुन मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि जीवन माने यांना बुधवारी एक दिवसाची किरकोळ रजा मिळण्याची विनंती केली. किरकोळ रजा मिळण्यासाठी जाधव यांनी दिलेले कारण चर्चेचा विषय बनले आहे.  आज सर्वत्र बेंदूर हा सण साजरा होत आहे. जाधव हे स्वत: शेतकरी कुटुंबातील असून त्यांना बैलांविषयी कमालीची आवड आहे. यामुळे बेंदूर सणादिवशी आपल्या सर्जा-राजाला सजवता यावे, त्याला रंगवून, पूजा करुन त्याचे लाड पुरवता यावेत, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी बेंदराला सुट्टीची मागणी केली आहे. 

बेंदूर  सणासाठी सुट्टी मिळण्यासाठी पोलिस कर्मचारी ए.टी.जाधव यांनी निष्पापपणे अर्ज टाईप करुन अर्जाच्या कारणामध्ये ‘बैलांबरोबर बेंदूर सण साजरा करण्याची इच्छा व्यक्‍त केली.’  सपोनि जीवन माने यांच्याकडे हा रजेचा अर्ज आल्यानंतर तेही हळवे झाले.  ते स्वत: देखील शेतकरी कुटुंबातील आहेत. बुधवारी मराठा क्रांती मोर्चा बांधवांनी जिल्हा बंदची हाक दिल्याने सर्वच पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तसेच गेल्या पाच दिवसांपासून वाहतुकदार संघटनेचे आंदोलनही सुरू आहे.  त्यामुळे सपोनि माने यांनी सुट्टीचा अर्ज घेवून आलेल्या पोलिस कर्मचारी जाधव याला खुर्चीसमोर बसण्यास सांगितले.

सपोनि जीवन माने यांनी बंद काळात पोलिसांना सुट्टी देणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र बंदोबस्तादरम्यान एक तास घरी जावून बेंदूर सण साजरा करण्याची परवानगी त्यांनी दिली. पोलिस ए.टी.जाधव यांनी दिलेल्या अर्जावर सपोनि जीवन माने यांनी एक तासाची मुभा दिल्याचा शेरा मारला. तो शेरा पाहिल्यानंतर पोलिसदादाला मोठा आनंद झाला व किमान एकतास तरी बैलांबरोबर घालवता येणार असल्याने त्यांनी पोलिस अधिकार्‍याचे आभार मानले. दरम्यान, हा अर्ज निकालीत निघाल्यानंतर तो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. सातारा पोलिस अधिकारी व कर्मचारी सध्या बंदोबस्ताच्या तणावाखाली आहेत. नुकतीच पंढरपूरची वारी असल्याने जिल्ह्यातील बंदोबस्तासह पंढरपूरलाही बंदोबस्त गेला होता. याशिवाय वाहतुकदारांचा व मराठा क्रांती मोर्चा आंदोलन यामुळे पोलिसांना सलग ड्युटी करावी लागत आहे. अशातच पावसाची उघडीप नसून बंदोबस्तात भिजल्याने अनेक पोलिस आरोग्याने त्रस्त आहेत.