Fri, Jul 19, 2019 01:02होमपेज › Satara › पोलादपूर घाट दुर्घटना : ..त्यांनी उभारला बांधिलकीचा अनोखा सेतू 

पोलादपूर घाट दुर्घटना : ..त्यांनी उभारला बांधिलकीचा अनोखा सेतू 

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:29PMमहाबळेश्‍वर : प्रेषित गांधी 

कुणीतरी म्हंटलं आहे, सत्कार्यासाठी काम करावं ‘सत्कारासाठी’ नाही. इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. याचाच प्रत्यय पोलादपूर घाटातील दुर्घटनेवेळी आला. टे्रकर्स, एनडीआरएफ जवानांनी  मदतीसाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र पडद्या मागे राहून काम करणार्‍या  ‘कलाकारां’चीही मदतीसाठीची धडपड महत्वपूर्ण ठरली आहे. ही धडपड बांधिलकीचा आणखी एक अनोखा सेतू उभारून गेली.

पोलादपूर येथील अपघातात दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची 600 फूट खोल दरीत कोसळली होती. यामध्ये कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाबळेश्‍वर येथील सहयाद्री ट्रेकर्स, महाबळेश्‍वर ट्रेकर्स, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेले ट्रेकर्स, विविध सेवाभावी संस्था, एनडीआरएफचे जवान तसेच लोकप्रतिनिधींनी या बचाव कार्यात मोलाची भूमिका बजाविली. 24 तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरु होते. या बचावकार्याला शनिवारी दुपारी 12.30 वाजता सुरुवात झाली  होती. आणि रविवारी दुपारी 1.00 वाजता संपले. 

या अपघाताने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला आहे. मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोशल मीडियावर अजूनही या अपघाताची चर्चा सुरुच आहे. दरम्यान, बचावकार्य करणार्‍या ट्रेकर्स, एनडीआरएफ, विविध संघटना व सेवाभावी संस्थांनी जीवाची बाजी लावून केलेल्या बचावकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या बचावकार्यात ‘पडद्या’ मागे राहून काम करणार्‍यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची ठरली आहे. त्यांचेही कौतूक होणे गरजेचे आहे. पडद्यामागे राहून काम करणार्‍या कलाकारांमुळे बचावकार्याला वेग आला होता. 

दरीतून मृतदेह काढण्याचे काम सुरु असताना या बचाव कार्यामध्ये सलग 26 तासांहून अधिक काळ ऊन, पाऊस, वारा झेलत उभे असणारे महाराष्ट्र पोलिस, प्रत्येकाला हवं नको ते बघणार्‍या कोळी काकू, महाबळेश्‍वर पालिकेतील अग्निशामक दलाचे  शिवाजी खंडझोडे, ननावरे, पालिकेच्या शववाहिनीचे चालक पवारकाका, महाबळेश्‍वर येथील अ‍ॅम्ब्युलन्सचे डॉ. अनंत वेलकर व चालक, आपल्या दोन्ही मुलांसोबत या कार्यात सहभागी असलेले धोंडीराम शेलार यांच्यासह प्रतापगड परिसरातील अनेक गावांमधील ग्रामस्थ दिवसरात्र सुरु असणार्‍या बचावकार्यात सहभागी झाले होते. 

तसेच बचावकार्य सुरु असताना मोफत जेवणाची सोय करणार्‍या संस्था व काही ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी बचावकार्यात ‘पडद्यामागे’ राहून आपली भूमिका पार पाडली  आहे. पडद्यामागच्या या खर्‍या कलाकारांना  सलाम...