होमपेज › Satara › दुसर्‍याच प्रयत्नात पियुषची यशाला गवसणी 

दुसर्‍याच प्रयत्नात पियुषची यशाला गवसणी 

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 10:45PMखंडाळा : श्रीकृष्ण यादव

भादे ता . खंडाळा गावचे सुपूत्र पियुष भगवानराव साळुंखे यांनी युपीएससी परीक्षेत राज्यात 5 वा आणि देशात 63 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले असून युपीएससीतील यशामुळे  जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

पियुष साळुंखे हे काही वर्षापूर्वी भादे येथून पुणे येथे कामानिमित्त गेले होते. त्यामुळे त्यांचे कुटूंबीय पुण्यातच स्थायिक आहेत. पियुष यांचे 12 वीपर्यंतचे शिक्षण सेंट व्हीचेन्ट कॉन्व्हेंट स्कूल कॅम्प येथे झाले. त्यानंतर इलेक्ट्रीकल्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंगची पदवी फर्ग्युसन कॉलेजमधून घेतली तर नवलमल फिरोदीया कॉलेजमधून त्यांनी लॉचे शिक्षण पूर्ण केले.  एक वर्ष हैदराबाद येथे सायबर लॉचा अभ्यासक्रम पूर्ण केला . त्यानंतर युनिक अ‍ॅकॅडमी येथे तीन वर्ष स्पर्धा परीक्षेची ते तयारी करत होते. 

2015 पासून त्यांनी युपीएससीतील अभ्यासाला सुरूवात केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना यशाने हुलकावणी दिली. त्यानंतर नव्या जोमाने दिल्ली येथे जावून वर्षभर परीक्षेची तयारी केली. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात पियुष यांनी यशाला गवसणी घातली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक टार्गेट निश्‍चित केले होते. त्यानुसार अभ्यास पूर्ण केल्यानेच हे यश मिळाल्याचे पियुष यांनी सांगितले. या यशामध्ये आई, वडील, बहिण आणि दाजी यांचा मोलाचा वाटा आहे. हे यश मिळवल्याबद्दल जिल्ह्याच्यावतीने त्यांचा पहिला सत्कार भाजपचे पुरूषोत्तम जाधव, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव, लोणंद बाजार समितीचे संचालक भूषण शिंदे आणि उद्योजक हिंदूराव हाके-पाटील यांनी केला. यावेळी जिल्ह्यातील तरूणांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन पियुष यांनी दिले.

पहिल्यापासून आयएएस होण्याचे ध्येय ठेवले होते. आयुष्यात काहीतरी करायचे होते आणि तेही सकारात्मक पध्दतीने असा निर्धार ठेवला होता. यातूनच हे यश प्राप्त झाले. आजच्या तरूणांनी मोठी स्वप्ने पहावीत. आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी. त्यासाठी आपल्यात क्षमता निर्माण केल्या पाहिजेत. - पियुष साळूंखे