होमपेज › Satara › गावठी पिस्टल जप्त; बाबा मोरेसह दोघांना अटक

गावठी पिस्टल जप्त; बाबा मोरेसह दोघांना अटक

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 10:06PMकराडः प्रतिनिधी 

विंग (ता. कराड) येथे कराड तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. शनिवारी रात्री अकरा वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.  

या कारवाईत बाबासो रघुनाथ मोरे (रा. पाचुपतेवाडी-तुळसण, ता. कराड) या सराईत गुन्हेगारासह अरुण मारुती कणसे (रा. विंग, ता. कराड) याला पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली.  

डीवायएसपी नवनाथ ढवळे म्हणाले की, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर यांना मिळालेल्या माहितीनुसार विंग येथे सागर परमिट रूमजवळ गावठी पिस्टल घेऊन दोघेजण येणार असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेवरून गुन्हे अन्वेषण विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी व हवालदार महेश सपकाळ, शशिकांत काळे, अमित पवार, धनंजय कोळी, अमोल पवार, शशिकांत घाडगे यांनी कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत विंग येथील हॉटेल सागर परमीट रुम परिसरात सापळा लावला. यावेळी हॉटेलसमोर बाबा मोरे व अरुण कणसे उभे होते. पोलिसांना पाहताच ते दोघेही कावरेबावरे झाले व तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पोलिसांनी त्वरित त्यांना पकडले व त्यांची अंगझडती घेतली असता बाबा मोरे याच्या खिशात एक गावठी पिस्टल तर अरुण कणसे याच्या खिशात दोन रिकाम्या पुंगळ्या पोलिसांना आढळल्या. 

मोक्का किंवा तडीपारीसाठी प्रयत्न करणार : डीवायएसपी 

बाबा मोरे हा संजय पाटील हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. त्याच्यावर अपहरण, विनयभंग व अवैध शस्त्र जवळ बाळगणे आदी गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई किवा त्याला तडीपार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बाबा मोरे जवळ बिगर परवाना गावठी बनावटीचे पिस्टल आले कुठून याचाही शोध घेत असल्याचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी सांगितले.