Wed, May 22, 2019 21:15होमपेज › Satara › कराड : ‘त्या’ फलकांमुळे टळला अनर्थ

कराड : ‘त्या’ फलकांमुळे टळला अनर्थ

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 11:22PMकराड : प्रतिनिधी

एखादी कृती अथवा माहिती किती फायदेशीर ठरू शकते, हे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच लक्षात येते. अगदी असाच प्रकार सोमवारी कराडमध्ये घडला. सोमवारी गॅस गळतीनंतर काही मिनिटात हॉटेलमध्ये आग लागली आणि फलकावर अग्निशमनसह पोलिसांचे नंबर असल्याने नागरिकांनी त्वरित या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास कराडमधील मुख्य बाजारपेठेतील चावडी चौकात स्वप्नील रेस्टॉरंटमध्ये गॅस गळती झाली. गॅस गळतीनंतर झालेल्या स्फोटात आसपासच्या सहा ते सात दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंटमध्ये दोन सिलेंडर होते. एक अर्धवट भरलेला होता. तर दुसरा पूर्णपणे भरलेला होता. स्फोटानंतर काही मिनिटांनी प्रथम धूर आणि नंतर काही वेळातच आगीचे लोट रेस्टॉरंटमधून बाहेर पडू लागले होते. त्यामुळे सिंलेडरनी पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडला असता. 

केवळ स्फोटाच्या आवाजाने झालेले नुकसान पाहता जर सिलेंडरचा स्फोट झाला असता तर काय अनर्थ घडला असता? याची कल्पनाच न केलेली बरी. मात्र यावेळी तारणहार ठरला तो सोमवार पेठेतील प्रत्येक इमारतीत दीड वर्षापूर्वी लावलेला माहिती फलक.

हा माहिती फलक नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकाराने लावण्यात आला असून यावर फलकावर पोलिस स्टेशन, रूग्णालये, अग्निशमन, हॉस्पिटल, वीज वितरण कंपनी, ब्लड बँक, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, पाणी पुरवठा कार्यालय यासह नागरिकांना आवश्यक असणार्‍या कार्यालयाचे फोन नंबर या फलकांवर नमूद करण्यात आले आहेत. 

याच फलकावरील नंबर पहात नागरिकांनी पोलिसांसह अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अनर्थ टळला. त्यामुळेच या फलकांचे महत्त्व किती आहे ? याची जाणीव कराडकरांना झाली आहे.  त्यामुळेच आता अन्य नगरसेवकांसह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत शुभेच्छांचे फलक लावण्यापेक्षा सर्वसामान्यांना आवश्यक माहितीचे असे फ्लेक्स लावणे गरजेचे असल्याचे सिद्ध झाले आहे.