Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Satara › व्यापारी संकुल बनले तळीरामांचा अड्डा

व्यापारी संकुल बनले तळीरामांचा अड्डा

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:05PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 

सर्वसामान्यांना त्रास होऊ नये तसेच नगरपंचायतीला उत्पन्न मिळावे, यासाठी पाटणमध्ये लाखो रूपये खर्च करून व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. मात्र उद्घाटनाअभावी हे संकुल अक्षरश: धूळ खात पडून आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे संकुल ‘तळीरामांचा अड्डा’ बनले आहे. त्यामुळे पाटणच्या ‘कारभार्‍यांना’ उद्घाटनाचा मुहूर्त मिळणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्हा ग्राम निधितून कर्ज काढून हे मोक्याच्या ठिकाणी तब्बल 21 गाळ्यांचे भव्य संकुल उभारण्यात आले आहे. मात्र कधी सांडपाणी विल्हेवाट तर कधी फरशी अथवा वीज कनेक्शन अशा तकलादू कारणे पुढे करून व्यापारी संकुलाचा वापर तसेच उद्घाटन लांबविण्यात आले आहे. वास्तविक जर हे गाळे भाडेतत्त्वावर दिले, तर यातून अनामत रक्कम व दरमहा भाडे असे लाखो रुपयांचा महसूल नगरपंचायतीला मिळेल. मात्र तितकासा सकारात्मक पाठपुरावा होत नसल्याने तब्बल सहा वर्षे हे व्यापारी संकुल धूळ खात पडले आहे. याशिवाय घेतलेले कर्ज, त्याचे हप्ते व या सर्वामुळे होणारा महसुली तोटा वेगळाच. 

सुमारे 11 वर्षापूर्वी म्हणजे 2007 साली या व्यापारी संकुलाचा विषय सुरू झाला. त्या वेळेपासून दोन ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. तर दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊन तिसरी निवडणूक पार पडली. येथे नगरपंचायत कार्यरत झाली.  मात्र हे गाळे सुरू करण्याचा शिवधनुष्य उचलण्याचे आव्हान कोणीच पेलू शकलेले नाही. वास्तविक आजवर या संकुलाचा सकारात्मक वापर तर होत नाहीच. त्यामुळे याठिकाणी अक्षरश: तळीरामांचा अड्डा तयार झाला आहे. 

याशिवाय जुगारी मंडळीचा पत्यांचा डावही रंगतो. मोकळ्या, फुटक्या दारूच्या बाटल्या आणि त्यांचे ढिग पहावयास मिळतात. त्यामुळे किमान यापुढच्या काळात तरी या संकुलाचा सकारात्मक वापर होण्यासाठी पदाधिकारी व नेत्यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच या व्यापारी संकुलाचा वर्षानुवर्षे गुदमरलेला श्‍वास केव्हा मोकळा होणार? असा प्रश्‍नही यानिमित्ताने नागरिक उपस्थित करू लागलेत.

पाटणमध्ये लोका सांगे ब्रम्हज्ञान अन् ....

गावाला स्वच्छतेचा संदेश कारभार्‍यांच्या ताब्यातील या इमारतीत कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वत: ...’ यासारखी अवस्था पाटणमध्ये पहावयास मिळते. याशिवाय ही इमारत म्हणजे फुकटच्या प्रसिद्धीसाठी हक्काचे व्यासपीठ होऊन ते बॅनर, फलकांच्या विळख्यात सापडल्याचे पहावयास मिळते.