Thu, Apr 25, 2019 16:05होमपेज › Satara › साहित्यातून समाजाला मार्गदर्शन मिळते

साहित्यातून समाजाला मार्गदर्शन मिळते

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 10:37PMपाटण : (स्व. भडकबाबानगरीतून)

साहित्य हे जीवन अनुभवायला शिकविते. साहित्य जीवनात आनंद निर्माण करते. साहित्यिक व राजकारणी यांचा संबंध चांगला असेल, तर देशाचा भाग्योदय होण्यास वेळ लागणार नाही. समाजाला साहित्यातून मार्गदर्शन होत असते. जागतिक ज्ञान मिळविण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. आज खर्‍याअर्थाने पुस्तकाची गरज असून पुस्तकाशिवाय समाजाला पर्याय नाही, असे मत ज्येष्ठ कवी व लेखक प्रा. वैजनाथ महाजन यांनी व्यक्‍त केले.  येथील स्व.भडकबाबा नगरीमध्ये तिसर्‍या ग्रंथ महोत्सव आणि साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. शंभूराज देसाई, स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य हिंदूराव पाटील, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कृष्णराजे महाडीक, साहित्यिक अरूण खांडके, ए. व्ही. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व. भडकबाबा यांच्यासारखी थोर मंडळी पाटण तालुक्याला लाभली, हे तालुक्याचे भाग्य आहे. वाचन संस्कृती रूजली पाहिजे. साहित्य निखळ हसवते. साहित्य मोकळ्या मनाला भरून काढते. संमेलनात मानसिक खड्डा भरून पुढे नेण्याची ताकद असते. किती जगला, यापेक्षा कसा जगला ? हे महत्वाचे असून त्यासाठी साहित्याची नितांत गरज आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही साहित्याच्या अभ्यासासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आज समाजात शिक्षण व्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या परीक्षा पध्दतीमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे महाजन यांनी सांगितले.

आ. शंभूराज देसाई यांनी  भडकबाबांनी लोकनेत्यांच्या विरोधात विधानसभेची उमेदवारी माघारी घेतल्याने ते बिनविरोध विजयी झाले होते आणि ते राज्यातील एकमेव आमदार होते, हे देसाई घराणे कधीच विसरणार नाही. यावेळी हिंदूराव पाटील यांचेही भाषण झाले. प्रारंभी अ‍ॅड. सौरभ देशपांडे  यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संयोजक विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वागत केले. दुर्ग संमेलनाचे अध्यक्ष बकाजीराव निकम यांनी आभार मानले.