Tue, May 21, 2019 00:20होमपेज › Satara › नगरपंचायतीकडून पाटण गेले ‘खड्ड्यांत’

नगरपंचायतीकडून पाटण गेले ‘खड्ड्यांत’

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 11:30PMपाटण : प्रतिनिधी 

पाटण शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य पाणीटाकीजवळील रस्त्याची पाटण नगरपंचायतीकडून अक्षरशः चाळण करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून हे खड्डे व त्यात टाकलेल्या पाईप ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. याच विभागात सुरू असणारी पाईपलाईन गळती शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आणत आहे.  नियोजनाशिवाय आयोजन व नगरपंचायतीतील मुख्याधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक व नियुक्‍त अभियंते यांच्यात कोणताही मेळ नसल्याने पाटण शहर अनेक बाजूंनी ‘खड्ड्यांत’ निघाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कर भरणार्‍या नागरिकांमधून व्यक्‍त होत आहेत. 

पाटण ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. मात्र, स्थानिकांच्या पदरात काय पडले? राज्यात, देशात ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवत ‘बुरे दिन’ आले. त्याचा  नमुना येथे अनुभवास येत आहे. पूर्वीची 
ग्रामपंचायतच बरी असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दीड वर्षांपासून नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. कोट्यवधींचा निधी मंजूर परंतु त्याचा निश्‍चित विनियोग होत नाही. तर नियोजनाशिवाय हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण तर होतच नाहीत. याउलट पहिल्यापेक्षाही रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत अनेक  तक्रारी आहेत. 

 काही दिवसांपूर्वी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणार्‍या पाणी टाकीजवळ रस्त्यावर यंत्रांच्या सहाय्याने भलेमोठे खड्डे, चरी काढण्यात आल्या. त्यात पाईपही टाकण्यात आल्या मात्र संबंधितांना नक्‍की कोणता तांत्रिक साक्षात्कार झाला समजलाच नाही, मध्येच कामच बंद केले. ते खड्डे, चरी, पाईप तशाच उघड्या पडल्याने त्या पाईप चोरीला जाऊ शकतात तर अपघातालाही निमंत्रण देऊ शकतात. याला सर्वस्वी संबंधित यंत्रणा जबाबदार असेल. याशिवाय हे काम करताना अनेक छोट्या पाईप  फुटल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाण्याची डबकीही साचत आहेत. साहजिकच रोगराईला निमंत्रण मिळत आहे.  हा वाया जाणारा जनतेचा पैसा मुख्याधिकारी, अभियंता व पदाधिकारी यांच्याकडून वसूल करावा किंवा रस्ते पूर्ववत करावेत अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.