होमपेज › Satara › ते आले..त्यांनी ऐकलं..आणि निघून गेले

ते आले..त्यांनी ऐकलं..आणि निघून गेले

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 10 2018 11:21PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण पंचायत समितीमध्ये सध्या पदाधिकार्‍यांपेक्षाही अधिकारी मंडळीचा वरचष्मा वाढला आहे. प्रशासकीय शिस्त वरिष्ठांपासून थेट कनिष्ठ अधिकारीही मोडीत काढू लागल्याने विरोधकच काय पण सत्ताधारी मंडळीही पदाधिकार्‍यांना थेट जाहीर जाब विचारू लागली आहेत. निश्‍चितच ही विकासात्मक व सार्वत्रिकदृष्ट्या चुकीची बाब ठरत आहे. केवळ आवाज वाढवून सदस्यांचे तोंड बंद करण्याऐवजी आता अधिकार्‍यांची पाठराखण करण्यापेक्षा त्यांच्यावर कारवाईचा दंडूका हाच रामबाण उपाय आहे. अन्यथा येथे आढावा बैठका म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने ’ ते आले . . त्यांनी ऐकलं . . आणि निघून गेले ’ . हीच अवस्था येथील एकूणच कारभाराची असल्याच्या तक्रारी आहेत. 

पंचायत समिती प्रशासकीय कामांबाबत सार्वत्रिक नाराजी आहे. ही केवळ सामान्य जनता, ठेकेदार यांच्यापूरतीच मर्यादीत राहीली नसून आता त्याचा फटका थेट लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्य ते अगदी पदाधिकार्‍यांनाही बसू लागला आहे. संबंधितांच्या या गलथान प्रशासकीय कारभारामुळे पंचायत समिती कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असतानाही केवळ समज, सुचना व इशारे देण्यातच पदाधिकार्‍यांना धन्यता वाटते हीच खरी शोकांतिका आहे. त्यामुळे या मंडळींची नक्की मजबूरी काय ? हाच आता संशयाचा व संशोधनाचा विषय बनला आहे. कारण या सभागृहात दरमहा आढावा बैठका होतात. तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा अनेक विषयांचा यात आढावा घेऊन त्यावर तत्काळ अवश्यक त्या उपाययोजना अथवा कारवाया करण्यासाठीच हे सभागृह असते. व यासाठीच मोठ्या विश्‍वासाने जनतेनेही या लोकप्रतिनिधींना निवडूनही दिलेले असते. मात्र आजवरच्या बहुतांशी बैठकीत अपवाद वगळता संबंधित महत्त्वाचे व अधिकृत अधिकारी येथे हजरच नसतात. काही अधिकारी तर महिनोंमहीने किरकोळ कारकूनांना पाठवून आढावा देतात तर काही बहाद्दर कोणाला पाठवायची तसदीही घेत नाहीत. वारंवार यांना पत्रे, स्मरणपत्रे, इशारा, 

नोटिसा देऊनही त्याला हीच मंडळी केराच्या टोपल्या दाखवितात हाच आजवरचा इतिहास आहे व वर्तमानही. कारवायांचे अधिकार असणारे वरिष्ठ अधिकारी असो किंवा पदाधिकारी हे केवळ इशारेच देण्यात धन्यता मानतात. तर याचा कायमचा सराव झाल्याने मग संबंधितांवरही याचा कोणताही व कसलाही परिणाम होत नाही हे चित्र असते. 
अनेकदा बैठकांना पदाधिकारी आधी व अधिकारी, कर्मचारी नंतर असे चित्र पहायला मिळते. सभा सुरू असताना कोणीही, कधीही आणि कसाही येत व जात असतो कोणाचीच शिस्त अथवा दहशत येथे पहायला मिळत नाही. याशिवाय अधिकारी, कर्मचार्‍यांची ही तर्‍हा तर पदाधिकारी मंडळी तेच ते प्रश्‍न आणि त्याच त्या मागण्या करताना अनेकदा दिसतात. ठराव घेणे ही तर इथली फॅशनच. त्यामुळे मागचे प्रश्‍न, मागणी किंवा ठरावाचे पुढे काय झाले  ? याचा आढावा घेण्याऐवजी ’ पुढचे पाठ आणि मागचे सपाट ’ . असाच कारभार येथे अनुभवायला मिळतो. 

‘आधी लगीन विकासाचं..आणि मग इतरांचं ’ 
एका बाजूला अधिकारी मंडळीची ही अवस्था आहे. तर सार्वजनिक विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या लोकप्रतिनिधी यांनाही या कामांसाठी विश्‍वासाने निवडून दिले जाते. महिन्यातील एका बैठकीवर तालुक्याची दिशा व दशाही अवलंबून असते. मात्र कधी मार्च एन्ड कधी पि. आर. सि. दौरा तर कधी लग्नांच्या तिथी यालाच जास्त प्राधान्य मिळते. आणि जनसामान्यांचे प्रश्‍न मागे पडतात. त्यामुळे यापुढे तरी ’ आधी लगीन विकासाच अन् मग इतरांचं ’ किमान एवढा तरी शिष्टाचार पाळावा या सामान्यांच्या अपेक्षा आहेत.