होमपेज › Satara › कोयना धरण जलविद्युत प्रकल्प पाहण्यावर बंदी

कोयना धरण जलविद्युत प्रकल्प पाहण्यावर बंदी

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:56PM

बुकमार्क करा
पाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना धरण सुरक्षेच्या कारणास्तव लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे नेहमीच चर्चेत असते. आता या धरणातील पाण्यावर निर्माण होणार्‍या वीजनिर्मिती प्रकल्पांवरही सुरक्षेची कुर्‍हाड कोसळली आहे. यापुढे कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या चारही टप्प्यांकडे जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. 

केंद्रीय गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर ही बंदी घालण्यात आली असून संबंधित विभागांना नुकतेच याबाबतचे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. आजपर्यंत कोयना धरण आणि सुरक्षा हा नेहमीच ऐरणीवरचा विषय होता. काही वर्षांपूर्वी मुंबई येथे एका अतिरेक्याकडे कोयना धरणाचा नकाशा सापडला म्हणून कोयनेतील बोटिंगच बंद करण्यात आले होते. दळणवळ  व पर्यटन विकासावर याचा परिणाम झाला. 

आता मुळातच डोंगराच्याखाली असणारे यापैकीच जलविद्युत प्रकल्पही सुरक्षेच्या नावाखाली बंद करणे कितपत योग्य आहे, असा सामान्यांचा प्रश्‍न आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग नवी दिल्ली, मुख्य महाव्यवस्थापक  (सुरक्षा) मुख्य कार्यालय मुंबई व जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांनी केलेल्या सूचनेनुसार जलविद्युत प्रकल्पांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यापुढे अभ्यांगतांना पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे, कोयना धरण पायथा वीजगृह हे प्रकल्प पाहता येणार नाहीत, असे परिपत्रकच मुख्य अभियंता महानिर्मिती पोफळी यांनी काढले आहे. ते संबंधित सर्व प्रकल्प व त्यांच्या कार्यालयांना पाठवून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविक भारतीय अभियंत्याच्या बुध्दीमत्तेचा अविष्कार या जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या रूपाने पहायला मिळतो. नव्या पिढीला व प्रामुख्याने तांत्रिक, औद्योगिक क्षेत्रातील मंडळीसाठी अभ्यास, दिशा व दूरदृष्टीसाठी निश्‍चितच असे प्रकल्प मार्गदर्शक ठरतात. असे प्रकल्प सर्वांसाठी खुले असणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सुरक्षेच्या नावावर बागुलबुवा करून असे प्रकल्प जनतेपासून दूर ठेवले जात आहेत.