Wed, Sep 26, 2018 16:40होमपेज › Satara › कोयना धरणातून पाणी सोडायला सुरूवात

कोयना धरणातून पाणी सोडायला सुरूवात

Published On: Jul 17 2018 4:39PM | Last Updated: Jul 17 2018 4:39PMपाटण  प्रतिनिधी  

कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तथापी मंगळवारी दुपारी तीन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे वर उचलून त्यातूनही पूर्वेकडे नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. 

गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर वाढल्याने धरणात सध्या मोठय़ा प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 78 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. तर  धरणात 76.07 टि. एम. सि. पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक्स तर दुपारनंतर धरणाचे सहा वक्री दरवाजातून विनावापर 5000 क्युसेक्स असे एकूण सरासरी सात हजार क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.