Fri, Jul 19, 2019 01:00होमपेज › Satara › कोयना बोटिंग लाल फितीतून कधी सुटणार?

कोयना बोटिंग लाल फितीतून कधी सुटणार?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण तालुक्यात पर्यटन व्यवसायाशिवाय सार्वत्रिक प्रगती नाही याची जाणीव असूनही गेल्या काही वर्षांत पर्यटनपूरक ध्येयधोरणे राबविण्याऐवजी आहे. त्यातच नानाविध अडचणी निर्माण करण्यात आल्या. दरम्यान कोयना परिसरातील बोटिंग व्यवसाय हा याच राजकारणात भरडला गेल्याने कोयनेच्या पर्यटनातील ही एक महत्त्वपूर्ण खिळ मानली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने आता या राजकीय साठमारीत न अडकता स्थानिकांचे दळणवळण व पर्यटन व्यवसाय या दुहेरी गरजा लक्षात घेऊन विनाकारण धरण सुरक्षेच्या बागुलबुवातुन हे बोटिंग  बाहेर काढावे अशा प्रतिक्रिया स्थानिकांसह पर्यटकांमधूनही व्यक्त होत आहेत. 

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पर्यटन वाढावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसते. अगदी देशातील महत्त्वपूर्ण धरणे हे पर्यटनाचा केंद्रबिंदू करण्याचा मानस पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ज्यावेळेपासून देशात व राज्यात या मान्यवरांच्या विचारांची सत्ता आली त्यानंतर येथे पर्यटनाला चालना मिळण्याऐवजी त्याला खिळ घालण्याचाच सर्वाधिक प्रयत्न झाला. कोयना धरणाच्या सुरक्षेचा बागुलबुवा करण्यात आला आणि धरणातील बोटींग बंद करण्यात आले. 
यामुळे पर्यटनाचे तर वाटोळे झालेच याशिवाय ज्या भुमीपुत्रांनी या धरणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्या दळणवळणासह दैनंदिन रोजगार, व्यवसाय व नागरी सुविधांची पुरती वाट लागली. धरणाची जमीन महसूल विभागाची, पाणी पाटबंधारे विभागाचे तर आजूबाजूचा परीसर वन व वन्यजीव विभागाचा. अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आदींच्या सिमाभागांचे त्रांगडे वेगळेच आणि याची सुरक्षा पोलीस यंत्रणेकडून केली जाते.

 यातच या अंतर्गत नानाविध विभागांचे कायदेकानून वेगवेगळे त्यामुळे त्या ठिकाणच्या संबंधित अधिकार्‍यांना काय वाटते यावर अनेक बाबी अवलंबून असतात. मात्र याचा स्थानिकांना किती त्रास होतो याचा दुर्दैवाने सध्या विचार होत नसल्याने कोयनेला दिवसेंदिवस बकाल रूप येऊ लागले आहे. आता स्थानिकांनी याबाबत सार्वत्रिक रान पेटवून बोटिंग पुन्हा सुरू होईपर्यंत हा लढा अधिकाधिक तीव्र करणे हेच एकमेव माध्यम असल्याचेही बोलले जात आहे.