पाटण : गणेशचंद्र पिसाळ
11 डिसेंबर 1967 साली झालेल्या महाविनाशकारी भूकंपाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोयनानगर येथे भूकंपबळींना श्रध्दांजली वाहण्यासाठी ‘भय इथले संपत नाही’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुर्दैवाने त्या भूकंपात 190 निष्पापांचा बळी गेला होता तेवढीही उपस्थिती यावेळी नव्हती. अपवादात्मक राजकीय पक्ष त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते वगळता अन्य पक्ष, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते अथवा वरिष्ठांपासून कनिष्ठ अधिकारी यांनीच नव्हे तर अगदी स्थानिकांनीही याकडे पाठ फिरवली होती. मग खरोखरच आपल्या संवेदना संपल्यात असेच म्हणावे लागेल.
सोमवारी कोयनानगर येथे कराड जिमखान्याच्यावतीने 11 डिसेंबर 1967 सालच्या भूकंपात बळी गेलेल्यांना श्रध्दांजली व त्यांच्या भावी पिढ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी ’भय इथले संपत नाही ’ अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता नियोजित केलेल्या या संवेदनशील कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर, कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दिपक मोडक, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह ठराविक मंडळी वेळेवर उपस्थित होती. यांच्यासह कराड जिमखाना पदाधिकारी व कराड, पाटण व कोयनेतील राष्ट्रवादी व भाजपची ठराविक मंडळी येथे उपस्थित होती. अक्षरशः संयोजक व पाहुणे वगळता अन्य मंडळीची उपस्थिती दयनीय तर होती. ज्यांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली आणि आपल्याला शेतीसह प्यायला पाणी दिले, स्वतःच्या आयुष्यात अंधार करून इतरांच्या जीवनात प्रकाश टाकला, भूकंपात स्वतःला गाडूनही घेतले अशांच्याप्रती केवळ कृतज्ञता व्यक्त करायची होती. याचे नियोजनही बाहेरच्याच मंडळींनीच केले होते. मात्र ज्या स्थानिकांनी हे सारे भोगले त्यांच्या भावी पिढ्या व यांच्याच जीवावर राजकारणासह सर्व काही उपभोगले ती कृतघ्न मंडळीही यावेळी उपस्थित नव्हती ही निश्चितच खेदजनक बाब ठरली. त्यामुळे मग या भूकंपग्रस्तांचे योगदान खरचं एवढं स्वस्त होत का ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बाहेरच्या मंडळीनी निदान हा कार्यक्रम घेवून आपली कृतज्ञता व्यक्त करीत शासनाला जाग आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मात्र जर संबंधितांनी झोप नव्हे तर झोपेचे सोंग घेतले असेल तर मग कोण काय करणार हाच खरा प्रश्न आहे. आपल्या संवेदनाच संपल्या असतील तर मग पन्नासच काय पण पाचशे वर्षे उलटली तरी हे प्रश्न सुटतील किंवा न्याय मिळेल यात शंकाच आहे.