Mon, Aug 19, 2019 07:29होमपेज › Satara › कोणाची होळी, कोणाची धुळवड;आज फैसला

कोणाची होळी, कोणाची धुळवड;आज फैसला

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 8:52PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

2019 ची विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे पाटण तालुक्यात अगदी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिकच नव्हे तर एखाद्या वॉर्डमधील पोटनिवडणुकीलाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होवू लागले आहे. इतरवेळी बिनविरोध चा फंडा कायम ठेवणार्‍या गावांनी राजकीय गटांचे अस्तित्व समजण्यासाठी यावेळच्या टप्प्यात बिनविरोध ऐवजी थेट निवडणूका लढून कौन कितने पाणीमे ची चाचपणी सुरू केली आहे. निश्‍चितच मग या दहा ग्रामपंचायतींच्या सरपंच तर यासह अन्य सदस्य , उमेदवार व त्यांच्या गटांचा चढउतार स्पष्ट करणारा निकाल बुधवारी जाहिर होणार आहे.
तालुक्यातील  जींती, उधवणे, शितपवाडी, गावडेवाडी, रूवले, गलमेवाडी, कुसरूंड, चौगुलेवाडी  ( सांगवड ) बेलवडे खुर्द, किल्ले मोरगिरी या सार्वत्रिक दहा तर गुढे येथे पोटनिवडणूक अशा 11 ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे.तर गुंजाळी गावची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या दरम्यान 80 जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली होती. त्यापैकी पाच ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली असून एका जागेसाठी निवडणूक होत आहे तर उर्वरित जागा पुन्हा रिक्त राहिल्या आहेत.  दहा ठिकाणच्या सरपंच पदासाठी विस उमेदवार तर यासह अन्य ठिकाणच्या सदस्य व पोटनिवडणूकांसाठी 144 असे एकूण 164 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आहे. यात पारंपरिक आ. शंभुराज देसाई व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या दोन्ही गटांसह राष्ट्रीय काँग्रेस , भाजप कार्यकर्त्यांसह अन्य अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

या निवडणुकीत स्थानिक उमेदवार त्या ठिकाणच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे भवितव्य पणाला लागले आहे.यावरच आगामी राजकीय गणिते अवलंबून आहेत. तर यानंतरच्या महत्वपूर्ण ग्रामपंचायत निवडणूकात मोठी लोकसंख्या असणारी व राजकीयदृष्टय तितक्याच महत्वपूर्ण गावांचा त्यात समावेश आहे .  2019 साली होणारी आगामी विधानसभा निवडणुक कदाचित मुदतपूर्व होईल किंवा ती लोकसभेबरोबरच होईल असे राजकीय अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणूका कधीही होवोत आ. शंभुराज देसाई असो किंवा सत्यजितसिंह पाटणकर या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न चालूच ठेवले असून दिवसेंदिवस त्यात वाढच होत असल्याचे चित्र आहे. विधानसभेच्या माध्यमातून विकासकामातून आ. देसाई तर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानपरिषद व राज्यसभा यातून सत्यजितसिंह यांनी कामांचा धडाका लावला आहे. भूमीपूजने, उद्घाटने यासह वैयक्तिक गाठीभेटी, लग्न, वास्तुशांत या शुभ तसेच अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन आदी दुःखद ठिकाणीही मान्यवरांच्या वाढलेल्या भेटीही याचेच ध्योतक मानले जात आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणूकीवर विधानसभेचे आडाखे बांधणे योग्य नसले तरी त्यादृष्टीने अंदाज बांधून आगामी वाटचाल करण्यासाठी या निवडणुकांचा राजकीय वापरही केला जात आहे.