Sun, Feb 23, 2020 11:23होमपेज › Satara › डोंगरकपारीत घुमतोय वाद्यांचा निनाद

डोंगरकपारीत घुमतोय वाद्यांचा निनाद

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 9:51PM

बुकमार्क करा

परळी : वार्ताहर 

सातारा तालुक्यातील परळी खोर्‍यातील डोंगर कपारीत सध्या गवत काढणीचे सौंदे सुरू असून  ‘गाव करील ते राव करील काय’ याचा प्रत्यय येऊ लागला आहे. आख्खा गावच्या गाव एकजुटीने ही कामे करत असून त्यामुळे  डोंगर कपारीत वाद्याचा निनाद ऐकायला मिळत आहे. 

 सौदा म्हणजे गावातील किमान 50 ते 60 जणांचा समुह डोंगर कपारीत गवत काढणीचे काम करत असतो.  महिला, पुरुष, वयोवृद्ध  एकत्र येवून ढोल, हलगी, अगदी हे नाही मिळाल तर पराती, ताट वाजवत गवत काढण्यासाठी भली मोठी रांग केली जाते. 

 डोंगर कड्याकपारीत माणसांच्या उंचीइतकी किंवा त्यापेक्षाही जास्त गवत वाद्याच्या तालावर त्या लयात गवत काढणी केली जाते. एकीकडे गवत कापून त्याच्या पेंड्या बांधून मानेवरुन त्या वाहून नेल्या जातात. हे गवत गावे गायरान किंवा मालकी हक्काचे असते. ज्याचे गवत कापायचे असेल त्याने जेवणाची सोय करायची. हे जेवण सुद्धा डोंगरातच मिळेल त्या भांड्यात, पानावरही केले जाते. सौदा करीत असतानाच पायवाटा श्रमदानातून केल्या जातात. अजूनही डोंगर रांगांवर, शिवारात रस्ते नसतात. अशावेळी गावोगावी एकीतून श्रमदानातूनच ही कामे केली जातात. 

सौदा करताना म्हणजे गवत काढताना वाद्य वाजवले जातात. मोठमोठ्याने आरोळ्या दिल्या जातात. ज्यांच्या हातात विळा असतो त्याच्या पाठीमागे उभे राहून जोरजोरात वाद्ये वाजवत त्यांना कामासाठी जोश दिला जातो. याचबरोबर गवतात लपलेले हिंस्र प्राणी श्‍वापदे या वाद्याने दूर निघून जातात.  या सौद्याचा प्रत्यय सध्या कास पठार परिसर तसेच परळी खोर्‍यात येवू लागला आहे. डोंगर कपार्‍या गवत काढणीच्या या कामामुळे गरजू लागल्या आहेत. या अनोख्या कामामुळे डोंगर कपारीतील गावांची एकजूट पहायला मिळत 
आहे.