Sat, Jul 20, 2019 23:20होमपेज › Satara › जनता संयमी आहे; तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका

जनता संयमी आहे; तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:44PM

बुकमार्क करा
परळी : वार्ताहर

 परळी खोर्‍यातील गावांची, वाडीवस्त्यांची भौगोलिक परिस्थिती  वेगळी आहे. येथील नैसर्गिकरित्या असणारे धबधबे, उरमोडी प्रकल्प, सज्जनगड, घाटाई मंदिर यांच्या विकासाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील जनता शांत व संयमी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा. कोणत्या खात्याने कशा प्रकारे समस्या सोडवल्या, कोणती कार्यवाही केली याची माहिती मला तत्काळ मिळाली पाहिजे, अशा सूचना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सोनवडी-गजवडी येथील संपन्‍न झालेल्या प्रभाग बैठकीमध्ये दिल्या.

प्रभाग बैठकीत जि.प. सदस्या कमल जाधव, पं.स. सदस्या विद्या देवरे, पं.स. सदस्य अरविंद जाधव, माजी जि.प. सदस्य राजू भोसले, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस, वनक्षेत्रपाल महेश पाटील, बांधकाम वीज पुरवठा, एस.टी. महामंडळ, पशु वैद्यकीय, ल.पा., कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग  बैठकीच्या प्रारंभीच विविध गावच्या सरपंचांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला.  यामध्ये वीज वितरणच्या कामकाजाबद्दल गावागावातून रोष होता. ठोसेघर, कास पठारावर चार - चार दिवस विद्युत पुरवठा नसतो. स्ट्रीट लाईटची मागणी करूनही मंजुरी मिळत नाही. अधिकारी, कर्मचारी ऐकत नाही. गावागावातून विद्युत खांब धोकादायक स्थितीत  आहे. एस.टी. मंडळाच्या  बसेस कधीच वेळेवर येत नाहीत. बोगद्यातून बाहेर पडल्यावर बसेस बंद पडतात. शालेय विद्यार्थ्यांचे, प्रवाशांचे अतोनात नुकसान होत आहे. परळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात. त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार अनेकांनी केली.  

त्यावर आ. शिवेंद्रराजे म्हणाले, प्रत्येक खात्याच्या अधिकार्‍याने जबाबदारीने काम केले पाहिजे. माझ्यापर्यंत तक्रारी येता कामा नयेत. परळी खोर्‍यातील युवक मुंबईला कामानिमित्त जातात त्यांना या परिसरातच रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी रस्त्यांचे जाळे विणले आहे.  भांबवली धबधब्यासाठी 95 लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे. विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. एस.टी.च्या अधिकार्‍यांनी कारभारात सुधारणा करावी, नाहीतर आम्हीच एस.टी.च्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे यांनी दिला. प्रास्ताविक विस्तार अधिकारी शंतनू राक्षे यांनी केले. अरविंद जाधव यांनी आभार मानले.