Tue, Jul 23, 2019 10:54होमपेज › Satara › वीज अधिकार्‍याला घेराव

वीज अधिकार्‍याला घेराव

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 11:23PM

बुकमार्क करा

परळी :  वार्ताहर

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कर्मचार्‍यांची दुरुत्तरे आणि हलगर्जीपणा यामुळे संतप्त झालेल्या परळी परिसरातील 15 गावांतील शेतकर्‍यांनी मंगळवारी येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्‍यांना घेराव घातला.  दरम्यान, संबंधित अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मागण्यांबाबत दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास कार्यालय पेटवू, असा इशारा दिला.

परळी परिसरातील अंबवडे, काळोशी, कुरण, आरेदरे, पोगरवाडी, सोनवडी, गजवडी, लावंघर, करंजे, शिंदेघर, भोंदवडे, कारी यासह सुमारे 15 गावांत वीज वितरणचा सावळा गोंधळ सुरू आहे. भोंगळ कारभाराबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचत मंगळवारी संतप्त शेतकर्‍यांनी वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संबंधित अधिकारी सहायक अभियंता सतीश चव्हाण यांनी हे प्रश्‍न माझ्या अखत्यारित येत नाहीत, यासाठी तुम्हाला ग्रामीण विभागाचे अधिकारी बाळासाहेब मुंडे यांच्याशी चर्चा करावी लागेल, असे अजब उत्तर दिले. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी     
    
त्यांना घेराव घातला.  यावेळी शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर या अधिकार्‍याने त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला असता संबंधित प्रश्‍नांबाबत मी माहिती घेतो व दोन दिवसात कार्यवाही करतो, असे आश्‍वासन दिले. मात्र, या आश्‍वासनाने समाधान न झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास कार्यालय पेटवून देवू, असा इशारा दिला.

आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या कमलताई जाधव, पंचायत समिती सदस्य अरविंद जाधव, माजी जि. प. सदस्य भिकू भोसले, महेश जाधव, धनाजी कदम, महेश कदम, सुधीर जाधव, सुदाम खामकर, अंकुश कारंडे आदी शेतकरी सहभागी झाले होते.