Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Satara › ब्‍लॉग : तू बी माऊली अन्‌ मी बी माऊली!

ब्‍लॉग : तू बी माऊली अन्‌ मी बी माऊली!

Published On: Jul 12 2018 3:43PM | Last Updated: Jul 12 2018 3:44PMसतीश मोरे
 

आवडी सांगा जीवाचे आर्त ।
माऊली पुरवीत जाणोनी ।।
ज्ञानराज माझी माऊली ।
एका जनार्दनाची साउली ।।

पंढरीच्या वारीला ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी, टाळकरी, माळकरी,  वारीकरी, भक्तगण, सखे सोयरे, सज्जन सहभागी झाले आहेत. भक्तीच्या रसात सारे डुंबूंन गेले आहेत. राम कृष्ण हरी मंत्र जपत 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष करीत वारकरी चालले आहेत, चालत आहेत. कुणी ज्ञानोबाचे तर कोण तुकाराम महाराजाचे अभंग म्हणत आहेत. ज्यांना काहीच म्हणता येत नाही ते फक्त माऊली.. माऊली.. माऊली आणि माऊलीच म्हणत आहेत. कारण येथे सगळेच माऊली आहेत, माऊलीमय झाले आहेत. येथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. कुणी कोणाला नाव विचारत नाही, माऊली नावानेच सर्वांना बोलवतात.

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल रूप तुझे..

वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल. विठ्ठल भेटीची आस आणि संत महात्म्यांना भेटण्याची ओढ लागलेला वारकरी पंढरीच्या वारीला आला आहे. आळंदी ते पंढरपूर पायी वारीला फार वर्षाची परंपरा आहे. पंढरीची वारी देवाची वारी आहे तर आळंदीची वारी संताची आहे. वारीत महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील वारकरी सहभागी झाले आहेत. पंढरीच्या वारीला जाऊन दु:खाच्या बदली सुख घ्यायला अवघे वैष्णव चालले आहेत.

दु:खाचियेसाठी येथ मिळे सुख ।
अनाथाची भुक दैन्य जाय ।।
उदराचा राणा पंढरीसी आहे ।
उभारूनी वाहे पालवी तो ।।
जाणतियाहुनी नेणतियाची गोडी ।
आलिंगी आवडी करूनीया ।।

वारीत सहभागी होणारे सर्वजण खऱ्या सुखाचा आनंद उपभोगत आहेत. घरातील अडचणी, व्यवसायातील समस्या, प्रापंचिक कटकटी आणि रोजच्या जीवनातील तोचतोचपणा बाजूला सारून वारकरी वारीला आला आहे. घरी कधी सातच्या आत न उठणारा  पहाटे चार वाजता आंघोळ करून तयार असतो. स्वतःचे ताट न उचलणारा येथे ताट धुवून ठेवतो आहे, स्वतःची कपडे स्वत: धुतो, सारी कामे करत आहे. दुसर्‍याला मदत करताना आपला जवळचा पाहणारा येथे भेटेल त्याला मदत करण्यासाठी आतुर आहे. वारीत सहभागी व्यक्तीला कशीतरी पाच सहा तास झोप मिळते. तरीही तो ताजातवाना आहे. हे सर्व फक्त वारीतच पहायला मिळते. याचे कारण झोपेशिवाय उरलेल्या वेळेत त्याच्या ओठांवर फक्त माऊलीचे नाव आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम हे स्‍फुर्ती देणारे भजन आहे. राम कृष्ण हरी हा मंत्र आहे. हा मंत्र सहज आणि सोपा आहे. तो म्हणताना सोवळे -ओवळे, स्थळ -काळ, जात- वित्त आणि कुळाचे बंधन नाही. राम म्हणजे ह्दयात रमविणारा, कृष्ण आकर्षित करणारा आणि हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा परमात्मा. हा मंत्र वारीत चालताना, बसताना, उठताना सतत सुरू असतो. यातून वारकरी देवाला प्रेमाने हाक मारतो. रामकृष्णी टाहो नित्य फोडी.. असे ज्ञानदेव महाराज म्हणतात. लेकरू जसं आईच्या नावाने टाहो फोडते तसे वारकरी, टाळकरी, विणेकरी, माळकरी सारे वारीत नामाचा टाहो फोडतात.

भजन, कीर्तन, हरिपाठ, काकडा, जागर यामध्ये तहान भूक विसरलेला वारकरी माऊलीना सतत स्मरत असतो. वारीत सगळे माऊली आहेत. सकाळी सकाळी भेटलेल्या प्रत्येकाला काय माऊली झाली का आंघोळ? जेवला का माऊली? चहा घ्या माऊली,  एकडे या माऊली, पाया पडताना माऊली, चुकून पाय लागला तरीही माऊली. दिंडीत अभंगाची ओळ चुकला तर माऊली, पाणी पाहीजे असेल तर माऊली, काही पाहिजे असेल, नसेल तरीही माऊली असे म्हणून हाताने इशारा केला जातो.  

वारीत चालताना खूप गर्दी असते, सारे ओळीत शिस्तीने चालतात. एखादा बाहेर गेला तर ओ माऊली कुठे चाललाय. चालताना रस्त्यावर साईट पाहीजे असेल तर ओ माऊली, बाजुला ढकलायचे असेल तरीही ओ माऊलीच. वारीत सहभागी सगळे स्री, पुरूष, लहान मोठा, वयस्कर, बालक सारेजण माऊलीच. राग आला तरी मोठ्या आवाजात माऊली,  आनंद झाला तर हसत हात जोडून माऊली. जेवताना काही पाहिजे असेल तर ओ माऊली, कुणाला फोन केला तर सुरवातीला नमस्कार माऊली. एकत्र यायचे असेल तर माऊलींनो या, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर काहो माऊली, गर्दीत ढकलाढकली झाली तर असं का करताय माऊली. इथं माऊली हा शब्द प्रमाण आहे. दुसरं काही नाही.

अवघे वैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली म्हणतात. आई जशी आपल्या लेकरासाठी सर्व काही करते, मनापासून प्रेम करते, आईच्या मायेला अंत नसतो, तसे ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथातून अवघ्या विश्वाला दिले .

लेकुराचे हित ।
वाहे माऊलीचे चित्त ।।
ऐसी कळवळ्याची जाती ।
करी लाभाविण प्रीती ।।

माऊलींनी आई प्रमाणे सगळ्याचे लाड पुरवले. त्याचे नाव घेतलं की तनामनात स्फुलींग निर्माण होतं. आई हा शब्द उच्चारताच स्रीचे वात्सल्य जागे होते, त्याप्रमाने माऊली नाव घेतले की भगवंताच्या प्रीतीचा पान्हा जागा होतो.

लागलिया मुखा स्तना ।
घाली पान्हा माऊली ।।
उभयतां आवडी लाडे ।
कोड कोड पुरतसे ।।

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाची कवाडे खुली केली, देवाकडे जाण्याचा सोपा मार्ग दाखवला, त्याचे नाव घेताच ज्ञान ईश्वर आहे याची जाणीव होते. म्हणूनच माऊलींच्या नामाची गोडी अवघ्या वारीला लागली आहे.

कैवल्याचा पुतळा  ।
प्रगट भुतला ।।
मोक्ष मार्गीचा सांगाती ।
ज्ञानोबा माझा ।।

माऊली शब्दाची जादू.. 

माऊली शब्दात फार मोठी ताकद आहे. माऊली नाव घेतले की डोळ्यासमोर आई आणि ज्ञानेश्वर महाराज याची मूर्ती समोर येते. आई आणि माऊली शब्द बेंबीच्या देठापासून उच्चारले जातात. संपूर्ण शरीरात उर्जा निर्माण होते.  वारीत सर्व वयोगटातील स्त्री आणि पुरुष असतात. माऊली नावाने त्यांना हाक मारली की आईचे नाते तयार होतं आणि हात जोडले जातात. सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी उघड्यावर स्त्रिया पुरुष जवळ जवळ आंघोळ करताना दिसतात. मात्र माऊलीमय झालेल्या वारकर्‍यांना त्याठिकाणी त्यांची आई दिसते आणि वात्सल्याचा भाव निर्माण होतो.