Sat, Jul 20, 2019 02:18होमपेज › Satara › प्रतापगडच्या संवर्धनाची गरज

प्रतापगडच्या संवर्धनाची गरज

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:17PMपाचगणी : वार्ताहर

प्रतापगडावरील पायर्‍यांवर फोटो काढताना माकडांच्या धिंगाण्यात किल्ल्यावरील दगड कोसळून सांगली जिल्ह्यातील एका मुलाच्या डोक्यात पडून मुलगा जागीच ठार झाला. या घटनेमुळे प्रतापगडाच्या संवर्धनाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता एक अशी घटना घडली. मात्र, किल्ल्यावरील बुरूजांचे दगड ढासळू लागले आहेत. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांकडून किल्ल्याची पाहणी करून गडाचे संवर्धन करणे आवश्यक बनले आहे. यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. 

स्वराज्यावरील आलेले सर्वात मोठे संकट अफझल खान वधाचा प्रतापगड हा साक्षीदार आहे. त्यामुळे आजही या किल्ल्याला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक येतात. या किल्ल्याला 350 हून अधिक वर्षांचा कालावधी झाला आहे. एवढी वर्षे झाल्यानंतरही हा किल्ला दिमाखात उभा आहे. मात्र, आता याची तटबंदी व बुरूज ढासळू लागल्याने दुरूस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्य शासनाकडून या किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते. मात्र, देखभाल व दुरूस्तीचे नाव घेतले की नाके मुरडली जातात. ही मानसिकता आता बदलणे गरजेचे आहे. शिवरायांच्या काळात ज्या प्रमाणे रायगडाचे महत्त्व होते तेवढेच महत्त्व प्रतापगडचेही होते. 
रायगडच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने कोट्यवधीच्या निधीची तरतूद केली आहे. अशीच तरतूद आता प्रतापगड किल्ल्यासाठी करावी लागणार आहे. मागील वर्षी पावसाळ्यात किल्ल्याच्या एका बाजूची माती ढासळल्याने दरड कोसळली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी जरी  झाली नसली तरी किल्ल्याची दुरवस्था स्पष्ट दिसत होती. यापूर्वीही किल्ला परिसरात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, प्रशासन नेहमी याकडे दुर्लक्ष करत आहे. आज मुलाचे डोके फुटल्याने हा विषय ऐरणीवर आला. त्यानंतर पुन्हा ही गोष्ट विसरून मागचे पाढे पंच्चावन्न अशी परिस्थिती नको. प्रतापगडावरील झेंड्याचा तळाचा भाग डळमळीत झाला आहे. तटबंदीचा भाग जीर्ण अवस्थेला पोहचला आहे. प्रशासनाने प्रतापगडावर ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशी  केविलवाणी अवस्था आहे.

प्रतापगडावर संरक्षित रस्त्याची झालेली दुरवस्था. वाहनाच्या पार्किंगला कोणतेही संरक्षण कठडे नसल्याने निर्माण होणारेे अपघात याला जवाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. माकडांनी किल्ल्यावर धिंगाणा घालून पर्यटकांना त्रास दिला तरी वन विभाग मात्र झोपेतच असल्याचे परवाच्या घटनेवरून स्पष्ट होते. या सर्व गोष्टींचा विचार करता जिल्हा प्रशासनाने प्रतापगड संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे बनले आहे.