Wed, Jun 03, 2020 19:11होमपेज › Satara › पाचगणी स्थानक असुविधांचे आगार

पाचगणी स्थानक असुविधांचे आगार

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 9:03PM

बुकमार्क करा

पाचगणी : वार्ताहर

पाचगणी बसस्थानकात महत्त्वाच्या सुविधांची वानवा असून प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. अस्वच्छता, पाकिर्र्गची गैयसोय, बिघडलेले वेळा पत्रक, पाणी व्यवस्था यासह अनेक समस्यांनी पाचगणी बसस्थानक ग्रासले आहे. त्यामुळे हे बसस्थानक असुविधांचे आगार बनले आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने पाचगणी मोक्याचे स्थान असल्यामुळे या ठिकाणी एस. टी. सेवा महत्त्वपूर्ण आहे. पाचगणीतून महाबळेश्‍वर, पुणे, मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची नेहमी गर्दी असते. येथून जास्त उत्पन्न असतानाही नागरिकांना आगाराकडून सोयी सुविधा मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

बसस्थानकातील उपहार गृहातील सांडपाणी सोडल्याने दुर्गंधी पसरत आहे. याबाबत नागरिक व प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे गरजेचे असताना या ठिकाणी कुठेही शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही. पाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी शुध्दीकरण यंत्रणा नाही. यामुळे प्रवाशांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. 

पाचगणी बसस्थानकातील महत्त्वाची समस्या म्हणजे वेळेवर गाड्या फलाटावर न लागणे. येथून बाहेर पडणार्‍या बसेस या वेळेवर कधीच लागत नसल्याच्या तक्रारी अनेकांच्या असतात. या बसेस वेळेवर न लागल्याने विद्यार्थीनींसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

पुणे, मुबंईकडे जाणार्‍या बसेस ह्या प्रत्येक फलाटावर लावल्या जातात. परंतु ग्रामीण भागात अन्यत्र धावणा-या बसेस ह्या कधीच वाहनचालक व वाहक फलाटावर लावत नाहीत. यामुळे बस कोणती आहे हे पाहण्यासाठी नागरिकांची धावपळ होते. त्यातून अनेकदा भांडणे व चेंगराचेंगरी होत   असते. यासाठी वाहकांसह  बसचालकांनाही फलाटावर बस लावण्यासाठी प्रशासनाने शिस्त लावणे गरजेचे आहे.

पाचगणी बसस्थानकात बसस्थानकाशिवाय खासगी वाहने हे पार्किंग केली जात असल्यामुळे हे बसस्थानक आहे की अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍यांचे ठिकाण आहे हेच समजेनासे झाले आहे.