Thu, Mar 21, 2019 23:42
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › त्या अवैध उत्खननाचा पंचनामा मॅनेज 

त्या अवैध उत्खननाचा पंचनामा मॅनेज 

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 10:52PMपाचगणी : वार्ताहर 

कळमगाव, ता. महाबळेश्‍वर येथे एका धनदांडग्याकडून विनापरवाना बांधकाम व मातीचे उत्खनन सुरू होते. याबाबत दै.‘पुढारी’ने कळमगाव येथे अनधिकृत बांधकाम या मथळ्याखाली वृत्त प्र्रसिध्द केल्यानंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला आहे. महसूल विभागाने या बांधकामाचा पंचनामा केला आहे. या ठिकाणी 130 ब्रासचे उत्खनन केले असल्याचे नमूद करण्यात आले आहेे. मात्र, त्याची वाहतूक केली नसल्यचे सांगत संबंधितावर कृपा करून दंड ठोठावला नाही. वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर तीन दिवसांनी बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

कळमगाव येथील सर्वे नंबर 23/1 पैकी भुखंड क्रमांक 29 मध्ये 630 चौमीवर परवानगी न घेताच बांधकाम सुरू केले. त्यासाठी बेकायदेशीर मातीचेही उत्खनन करण्यात आले होते. त्यानंतर दै.‘पुढारी’ने यावर प्रकाश टाकून दि. 2 रोजी याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. यामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला. यानंतर अधिकार्‍यांनी पंचनामा करून या ठिकाणी 130 ब्रास उत्खनन झाले आहे. मात्र, याची वाहतूक केली नसल्याने दंड ठोठावता येत नसल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात वाहतूक झाल्यानेच मातीचे ढिगारे साठवण्यात आले आहेत.

तर पहिल्यांदा बांधकाम परवानगी नाकारणार्‍या जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 5 रोजी या बांधकामाला परनवागी दिली. आता परवानगी दिली असली तरी परवानगी घेण्यापूर्वीच बांधकामाला सुरूवात केल्याने संबंधितांवर गुन्हा का दाखल केला नाही? पंचनामा करताना मातीची वाहतूक दाखवलेली नाही त्यामुळे हा पंचनामा प्रांताधिकार्‍यांकडे गेला तरी संबंधितांना कोणताही दंड होणार नाही याची तजवीज प्रशासनाने केली आहे. या प्रकरणात संबंधितांना क्‍लिनचीट मिळावी यासाठी मंत्रालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फिल्डींग लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.

तलाठी, सर्कल, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना मॅनेज करत पंचनाम्यावर कारवाई होणार नाही अशी माहिती लिहिण्यातच धन्यता मानली आहे. या ठिकाणी 500 ब्रासहून अधिक मातीचे उत्खनन होवून त्याची वाहतूक झाली आहे. मात्र, असे असतानाही संबंधित तलाठ्यांनी बोगस पंचनामा सादर केल्याचा आरोप होत  आहेे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली असल्याचेही बोलले जात आहे.