Thu, Nov 15, 2018 09:29होमपेज › Satara › ...अन्यथा कोयना धरणाचा ताबा घेऊ : भारत पाटणकर 

...अन्यथा कोयना धरणाचा ताबा घेऊ : भारत पाटणकर 

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:19PMसातारा : प्रतिनिधी 

कोयना धरणग्रस्तांच्या शंभर टक्के पुनर्वसनासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. 31 जानेवारीपर्यंत आम्ही वाट बघणार आहेत. जर 31 पर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत सकारात्मक चर्चा नाही झाली तर कोयनेची वीज आणि पाणी बंद करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिला. मंगळवारपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यासाठी कोयना धरणग्रस्तांचे धरणे आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदोलनस्थळी भारत पाटणकर बोलत होते. 

पाटणकर म्हणाले, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्हा धरणग्रस्तांचे आंदोलन संपणार नाही. या पुढच्या आंदोलनात धरणग्रस्तांच्या काही मर्यादा असतील. त्या मर्यादा ओलांडायची वाट सरकारने पाहू नये. 

शांततेच्या मार्गाने राहून जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला आक्रमक पवित्रा उचलावाच लागेल. 31 जानेवारीपर्यंत आपण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहू. अन्यथा गनिमी काव्याने कोयना धरणाचा ताबा घेऊ, असा इशाराही पाटणकर यांनी दिला.

31 तारखेनंतरचे आमचे आंदोलन केवळ कोयना धरणग्रस्तांसाठी राहणार नसून त्याला राज्यव्यापी बनवले जाईल.  यामध्ये राज्यातल्या शेतकर्‍यांना सहभागी राहण्याचे आवाहन करणार आहोत.  31 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पायी गावोगावी मुक्काम करत कोयनेकडे कूच करु. वाटेत भेटतील त्या शेतकर्‍यांना सहभागी करुन घेऊन  हा लढा राज्यव्यापी करु, असेही पाटणकर म्हणाले.