Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Satara › सातारा-लोणंद चौपदरीकरण प्रस्तावाला विरोध

सातारा-लोणंद चौपदरीकरण प्रस्तावाला विरोध

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 11:26PMसातारा/खेड : प्रतिनिधी

सातारा-वाढे-वाठार-लोणंद या मार्गाच्या चौपदीकरणात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शेतकर्‍यांचे क्षेत्र संपादित करावे लागणार असून त्यामुळे संबंधित शेतकरी भूमिहीन होणार आहेत.   विविध प्रकल्पांतर्गत बर्‍याचदा भूसंपादन झाले असून पुन्हा  शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्यास लोकांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या मार्गाचा डीपीआर मंजूर करण्यात आला असून तो ग्रामस्थांना मान्य नाही. भूसंपादन रद्द करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा-वाढे-वाठार स्टेशन-लोणंद या मार्गाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार चौपदरीकरणासाठी वाढे गावच्या हद्दीतील वाढेश्‍वरनगर ते वेण्णा नदीपर्यंतचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुमारे 50 शेतकर्‍यांचे 40-50 एकर क्षेत्र भूसंपादनात जात आहे. वाढे गावचे यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, कण्हेर धरण अंतर्गत डावा व उजवा कालवा, धोम पाटबंधारे कालवा, धोम धरणांतर्गत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासाठी भूसंपादन झाला आहे. पुन्हा चौपदरीकरणासाठी भूसंपादन झाल्यास संबंधित शेतकरी भूमिहीन होवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.  जिल्ह्याच्या प्रारुप प्रादेशिक योजनेत सातारा-वाढे-लोणंद हा मार्ग 45 मीटर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळेही लोकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा चौपदरीकरणास विरोध असून त्यामुळे चौपदरीकरणाचा डीपीआर ग्रामस्थांना मान्य नाही. डीपीआर रद्द न केल्यास संबंधित शेतकर्‍यांच्या कुंटुंबांना आत्मदहनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी भूसंपादन अधिकारी कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी कोळी यांना महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पोतदार यांच्या समवेत प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी करावी व ग्रामस्थ, शेतकर्‍यांनी सुचवलेल्या पर्यायी जागेची माहिती घेवून 15 दिवसांत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. या निवेदनावर खेड, वाढे येथील सुमारे 30 बाधित शेतकरी व व्यावसायिकांच्या सह्या आहेत.