Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Satara › ‘लाच लुचपत’साठी  पाटण पं.स.चे  खुले आव्हान

‘लाच लुचपत’साठी  पाटण पं.स.चे  खुले आव्हान

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 7:31PMपाटण :  गणेशचंद्र पिसाळ 

पाटण पंचायत समिती अंतर्गत काही विभागात वरिष्ठ अधिकार्‍यांनाकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फोफावल्याच्या जोरदार चर्चा आहेत. याबाबत कनिष्ठ कर्मचार्‍यांकडून तक्रारी होवून देखील कोणत्याही सुधारणा होत नाहीत. प्रामुख्याने विशिष्ट लेखनिक व अधिकारी यांच्या रॅकेटमुळे लाच लुचपत विभागाला येथे खुले आव्हानच नव्हे तर आमंत्रणही आहे. सापळा रचून जर जाळे टाकले तर कनिष्ठच काय वरिष्ठांसह छोटे, मोठे मासेही या जाळ्यात अलगद सापडतील अशा जोरदार चर्चा याच पंचायत समिती अंतर्गत विभागात सुरू आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून पाटणच्या पंचायत समिती अंतर्गत काही विशिष्ट विभाग व त्यांचे लेखनिक व वरिष्ठ अधिकारी हे चांगलेच गैरव्यवहार चर्चेत आहेत. आपल्याच विभागातील खालचे कर्मचारी त्यांची कोणतीही बिले असोत त्यासाठीच्या टक्केवारीसाठी येथे मोठ्या प्रमाणावर अडवणूक होत असते. तर तीच अवस्था सार्वजनिक विकास कामे करणार्‍या ठेकेदारांची आहे. त्यामुळे मग या काही विभागात कोणतेही काम विनादक्षिणा होतच नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे मग निश्‍चितच कामाचा दर्जाही त्याच पद्धतीने होतो.

काही ठिकाणी तर संबंधित ठेकेदारांना काम झाल्यावर जेवढा नफा होतो त्याहीपेक्षा ती बिले काढण्यासाठी द्यावी लागणारी टक्केवारी अधिक होते. शिवाय यासाठी सातत्याने हेलपाटे संबंधित लेखनिकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची मनधरणी व पदाधिकार्‍यांची उठाठेव यामुळे संबंधित ठेकेदारांची ’ भिक नको पण, कुत्रं आवरं ’ . अशी अवस्था होते. एका बाजूला ठेकेदारांचा छळ करणारी हीच मंडळी आपल्या हाताखालच्या विभागातील संबंधित कर्मचार्‍यांची बिले काढतानाही मोठ्या अपेक्षा ठेवतात. कित्येकदा तर ठराविक किरकोळ बिलांसाठीही या टक्केवारीचा नैवेद्य हा जणू काही याच पंचायत समितीत शिष्टाचारच बनला आहे. असा येथे मोठ्या प्रमाणावर तक्रारींचा सुर आहे. 

नुकत्याच सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव या लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्या आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवरील ही कारवाई म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य अर्थवाहिन्या ठरणार्‍या पंचायत समितीच्या याच टक्केवारीच्या साडेसातीला अंतर्गत मंडळी पूरती वैतागली आहे. वरिष्ठ अधिकारी व ठराविक लेखनिक यांचे असणारे रॅकेट व त्यातूनच आपल्याच हाताखालच्या मंडळीची होणारी गळचेपी याबाबत या ना त्या कारणाने समाविष्ट पदाधिकारी कोणताही आवाज उठविणार नाहीतच. त्यामुळे आता अशा धेंडांना कायमचा धडा शिकविण्यासाठी आता येथे लाचलुचपत विभागाने यावे त्यांना हेच आमंत्रण तर भरडलेल्यांनी थोडेसे धाडस दाखवावे हेच त्यांना आवाहन अशाच सामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. 

पी. आर. सी.ची वर्गणी नक्‍की कोणाचा खिशात?

मध्यंतरी पंचायत राज समितीचा तालुक्यात दौरा झाला. याच मान्यवरांच्या खातीरदारीसाठी येथील पंचायत समितीच्या महत्वपूर्ण विभागातून मोठ्या प्रमाणावर वर्गण्या गोळा करण्यात आल्याच्याही चर्चा आहेत. तर याच खर्चाची जिल्हा परिषदेकडे तरतूद असतानाही मग या वर्गण्या कोणी व किती गोळा केल्या ? याशिवाय त्याचा झालेला खर्च व उर्वरित रक्कमा नक्की कोणाच्या खिशात गेल्या याचाही तपास व्हावा. आणि ते करूनही पुन्हा बिले काढताना होणारी अडवणूक व पिळवणूक याचीही चौकशी व्हावी अशाही सुप्त मागण्या येथे होत आहेत.