सातारा : प्रतिनिधी
सातार्यात आनंदा ज्ञानू इंगळे (रा. सैदापूर) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा सातारकरांना या आजाराची धास्ती लागून राहिली आहे. यंदा जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत 218 स्वाईन फ्लू संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सध्या 19 रूग्णांवर रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातच गणेशोत्सव येत असल्याने उत्सवकाळात मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वाईन फ्लूने बळी घेतल्यामुळे सातारा शहर व परिसरात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू आदी प्रकारच्या साथीच्या रोगांसाठी वातावरण पोषण आहे. त्यामुळेच या काळात स्वाईन फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच दुखणे अंगावर काढणे म्हणजे हा साथ रोग पसरविण्यासाठी एकप्रकारे आपण मदतच करण्यासारखे आहे. स्वाईन फ्लूला 48 तासांच्या आत जर प्रतिबंध केला, तर तो आटोक्यात येण्याची शक्यता असते. मात्र, अनेकजण पहिले तीन ते चार दिवस ताप अंगावर काढतात व मग डॉक्टरांकडे धाव घेतात. अनेकदा त्यामुळे डॉक्टरांच्या हातातही फारसे काही उरलेले नसते.
गौरी व गणपती उत्सवास अवघे आठ दिवस उरले आहेत. उत्सवात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे लोक एकत्र येतात. तसेच या उत्सव काळात अनेक ग्रामीण भागातील लोक पुणे-मुंबईसह इतर ठिकाणाहून अनेक सातारकर आपल्या मायभूमीत येतात. त्यामुळेच या काळात स्वाईन फ्लू हा रोग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच नागरिकांनी आता स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे.
सध्या स्वाईन फ्लूविरोधी लस अत्यंत महागडी असून ती जितक्या प्रमाणात अपेक्षित आहे, तितक्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळेच काळजी घेणे गरजेचे आहे.