Tue, Apr 23, 2019 09:56



होमपेज › Satara › ना. रामराजे : कै. हरिभाऊ निंबाळकर स्मृति पत्रकारिता पुरस्कारांचे शानदार वितरण 

ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी विधान भवनात बैठक

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 04 2018 10:02PM



 फलटण : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील पत्रकार अहोरात्र काम करत असतात. मात्र त्यांच्या अनेक अडचणी असून अनेक दिवस शासन दरबारी त्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी लवकरच माझ्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक लावू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणार्‍या आदर्श पत्रकारिता पुरस्कारांचे शानदार वितरण ना. रामराजेंच्या हस्ते झाले. 

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आयोजित राज्य, विभागीय, जिल्हास्तरीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना शिवसंदेशकार माजी आमदार हरीभाऊ निंबाळकर आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा फलटण येथे पार पडला. तेव्हा ना. रामराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. दीपक चव्हाण होते. व्यासपीठावर श्री सद‍्गुरू संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

ना.  रामराजे यांच्या हस्ते यावर्षीचे  कै. हरिभाऊ निंबाळकर स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे पत्रकारिता पुरस्कार  मुंबई दूरदर्शनच्या वृत्त संपादिका सौ.ज्योती आंबेकर,  दै.‘पुढारी’चे  वृत्त संपादक व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, खटाव तालुक्याचे पत्रकार  अविनाश कदम यांना प्रदान करण्यात आला तर  सामाजिक पुरस्कार आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील चित्रपट अभिनेते धोंडीबा कारंडे यांना प्रदान करण्यात आला.

ना. रामराजे पुढे म्हणाले, कै. हरिभाऊ निंबाळकर यांनी मला माझ्या पहिल्या नगरपरिषद निवडणूकीच्या वेळी मोठा धीर दिला होता. त्यांचे उपकार कधीही न विसरण्यासारखे आहे. मला फारशी प्रसिद्धीची हौस नाही. मी माध्यमांपासून दूर राहत असतो. राजकारणी व पत्रकारांची लिव्ह इन रिलेशनशिप असते. दोघांचेही एकमेकांशिवाय जमत नाही. राजकारण व पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे की आपल्या वागण्याचे प्रतिबिंब समाजावर लगेच उमटत असते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींनी वागताना जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे  आहे. 

एकीकडे तंत्रज्ञान विकसीत होत असताना दुसरीकडे या तंत्रज्ञानाचा चांगल्या बरोबरच वाईट वापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. पत्रकारांनाही आधुनिक  तंत्रज्ञानासोबत जुळवून घेवून काम करणे आव्हानात्मक आहे. पण तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या लिखाणाच्या कक्षा रुंदाव्यात. बाळशास्त्री जांभेकरांनी जे व्रत पत्रकारितेत जोपासले होते तेच डोळ्यासमोर ठेवून आधुनिक पद्धतीचा वापर करुन पत्रकारितेत प्रगती साधावी, असेही ना. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. हरीष पाटणे म्हणाले, धोम-बलकवडी कालव्याचा खंडाळा तालुक्यात जन्म झाला तेव्हाच माझ्याही पत्रकारितेचा जन्म झाला आणि पत्रकारितेतील पहिली लढाई मी रामराजेंशीच केली, हे अनेकांना माहित नाही. त्याच धोम-बलकवडीचे पाणी यावर्षी फलटणमध्ये आले आहे नेमके त्याच वर्षी  मलाही रामराजेंच्या हस्ते फलटणमध्ये बोलावून पुरस्काराने सन्मानित केले जात आहे हा अपूर्व योगायोग आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारानंतर व त्यानंतर ‘दर्पण’ पुरस्कारानंतर कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही, असे मी सांगितले होते. मात्र, फलटणमधील पत्रकारांचे सगळे गट एकत्र आले आणि त्यांनी शिवसंदेशकारांच्या नावाचा पुरस्कार न टाळण्याचा आग्रह केल्याने सातारा जिल्ह्यातील हजारो ग्रामीण पत्रकारांचा भाऊ या नात्याने या  पुरस्काराचा मी विनम्रपणे स्वीकार करतो, असे म्हणत पाटणे यांनी पुरस्काराची रक्‍कम व्यासपीठावरच खटाव येथील दिवंगत पत्रकार अरूण देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी अविनाश कदम यांच्या हातात सुपूर्द केली.  दरवर्षी खटावमध्ये स्व. अरूण देशमुख यांचा स्मृतिदिन साजरा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. 

सौ.ज्योती आंबेकर म्हणाल्या, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे काम उत्कृष्ट असून ना.श्रीमंत रामराजे  नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार जबाबदारी वाढवणारा आहे. यावेळी अविनाश कदम, धोंडिबा कारंडे, युवराज पाटील, अरविंद मेहता, रविंद्र बेडकीहाळ यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्तविक ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनवलकर यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत सोनवलकर व नवनाथ कोलवडकर यांनी केले. आभार श्रीरंग पवार यांनी मानले. 

यावेळी सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, पंचायत समिती सभापती सौ. रेश्मा भोसले, नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, पै. हेमंत निंबाळकर, जेष्ठ पत्रकार बापूसाहेब देशपांडे, प्रा.रमेश आढाव, सुभाष भांबुरे, शशिकांत जाधव, यशवंत खलाटे, स.रा. मोहिते व फलटणसह अन्य तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.