Mon, Jul 15, 2019 23:46होमपेज › Satara › दुधडेवाडीच्या वृद्ध महिलेला कराडात भर रस्त्यात लुबाडले

दुधडेवाडीच्या वृद्ध महिलेला कराडात भर रस्त्यात लुबाडले

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 10:02PMयेळगाव : वार्ताहर

दुधडेवाडी (येवती, ता. कराड) येथील पेन्शनधारक वृद्ध महिलेला बँकेतून पेन्शन काढण्यापूर्वीच तिघा भामट्यांनी लुबाडले. सोन्याचे बिस्कीट देतो, असे सांगून तिच्याजवळील दागिने घेऊन चोरट्यांनी तेथून पोबारा केला. कराडात बुधवारी (दि. 7) भर रस्त्यात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येवती (दुधडेवाडी) येथील श्रीमती अनुबाई हरिबा दुधडे यांच्या पतीच्या निधनामुळे त्यांना पेन्शन मिळत आहे. मिळणार्‍या पेन्शनवर त्या आपला चरितार्थ चालवतात. त्यामुळे महिन्यातून एकदा त्या पेन्शन आणण्यासाठी कराड येथील भारतीय स्टेट बँकेच्या शनिवार पेठ शाखेत जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा प्रवास सुरू आहे. बुधवारी (दि. 7) त्या लवकर आटोपून कराडला पेन्शन आणण्यासाठी गेल्या होत्या. परंतु, बँक उघडी नसल्याने त्या बँकेसमोरच असलेल्या फूटपाथवर थांबल्या होत्या. तेथे अचानक समोर आलेल्या तिघा भामट्यांनी सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने आपापसात संगनमत करून या वृद्ध महिलेला गर्दीतून बोलत-बोलत बाजूला झाडाखाली नेले.

तेथे गेल्यावर एकाने आपल्या हातातील अंगठी काढून समोरच्या व्यक्तीला दिली. नंतर भामट्याने अनुबाई दुधडे यांना तू आमच्या आईसारखी आहेस, तू पण गळ्यातील आणि कानातील दागिणे काढून दे आणि त्या बदल्यात हे ज्यास्त वजनाचे सोन्याचे बिस्कीट ठेव, असे आमिष दाखवले. भामट्यांच्या अमिषाला बळी पडल्याने वृध्द महिलेने अंगावरचा सोन्याचा ऐवज देऊन भामट्यानी दिलेले सोन्यासारखी दिसणारी पिवळीधमक बिस्कीटासारखी चीप घेऊन आपले काम करून घर गाठले. 

त्यानंतर तिने जाणकार मंडळींकडून खात्री केली असता आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिची हतबलता पाहून लोकांनी तिला पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला. मात्र, सायंकाळपर्यंत याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती.