Tue, Jun 02, 2020 01:16
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › जुने कारागृहात अन् नवीन मैदानात!

जुने कारागृहात अन् नवीन मैदानात!

Last Updated: Nov 07 2019 11:22PM
कराड : अमोल चव्हाण

पवन सोळवंडे याच्या खून प्रकरणानंतर केवळ तीनच महिन्यांत हल्लेखोरांनी विकास लाखे याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याचा खून केला. या घटनेमुळे कराडसह  मलकापूर व परिसरातील गुन्हेगारी संपविण्याचा विडा उचललेल्या पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. दोन वर्षात कराड  व उपविभागातील तब्बल चार गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. या टोळ्यांचे म्होरके कारागृहात असताना त्यांचे समर्थक मात्र मोकाट असून ते आपल्या टोळीची दहशत कायम ठेवत असल्याने कराडमध्ये गँगवारचा पुन्हा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. नव्याने सुरु झालेल्या टोळी युध्दातील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी कारवाई करून कारागृहात टाकले. मात्र, त्यांचे नवीन समर्थक मैदानात उतरल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.    

सुमारे दोन वर्षांपासून शांत असलेले कराड शहर पुन्हा संवेदनशील बनत आहे. हे गेल्या चार महिन्यांत झालेल्या दोन गोळीबाराच्या घटनांमुळे स्पष्ट होत आहे. शहर व परिसरात गुन्हेगारांची पाळेमुळे पुन्हा नव्याने रुजू लागली आहेत. ती अधिकाधिक घट्ट होण्यापूर्वीच उखडून टाकण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले. मात्र, या गुन्हेगारी टोळ्यांनी पोलिसांसमोर रोज नवे आव्हान उभे करण्यास सुरुवात केली आहे. या नव्याने सुरु झालेल्या टोळी युध्दात सर्वसामान्य जनता मात्र वेठीस धरली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच पाऊले उचलून गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. वारंवार घडणार्‍या गुन्हेगारी घटनांमुळे विद्येचे माहेरघर व सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या कराडकडे संवेदनशील व गुन्हेगारीचा अड्डा असलेले शहर म्हणून बघितलं जाऊ लागले तर ही बाब कराडच्या भविष्यासाठी गंभीर आहे.

महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील खून प्रकरण व त्यानंतरच्या कालावधीत गुंड सल्या चेप्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी कराड परिसर अनेकवेळा हादरून गेले होते. सततचे टोळी युद्ध व गुंडगिरीमुळे कराडच्या बाजारपेठेवर व पर्यायाने व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला होता. बबलू मानेचा खून व सल्या चेप्याच्या मृत्यूनंतर कराड शहरात काहीशी शांतता पसरली होती. त्यामुळे शहरावरील संवेदनशीलतेचा ठपका पुसला जात असतानाच काही किरकोळ गुन्हेगारी घटनाही घडल्या. परंतु, सध्या सुरु असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ती शांतता वादळापूर्वीची होती की काय? अशी शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. 

गत दोन वर्षात काही किरकोळ प्रकार वगळता गुन्हेगारांना खत-पाणी घालून पोसण्याचेच काम सुरू असल्याचे सध्याच्या गुन्हेगारी परिस्थितीवरून दिसून येते. या कालावधीत अनेक छोटे-मोठे गुन्हे करणारे आज टोळीचा मोरक्या किंवा एखाद्या घटनेचा सुत्रधार म्हणून समोर येत आहेत. छोटे-छोटे गुन्हे करत असताना भुरटे गुन्हेगार किंवा फुटकळ दादा स्वतःला भाई व दादा समजू लागले. यातूनच मग पुन्हा शहरात वर्चस्ववाद निर्माण होऊ लागला. त्यातून गुन्हेगारांमध्ये भांडणे, हाणामार्‍या होऊ लागल्या. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक तसेच अवैध धंदेवाले अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात आले. दुसर्‍या गँगपासून किंवा टोळीपासून धोका होऊ नये म्हणून किरकोळ गुन्हेगारी लोक किंवा अवैध धंदेवाले गुन्हेगारांचा आश्रय घेऊ लागले. यातूनच मग अनेकवेळा टोळी युद्धाला तोंड फुटले. 

पवन सोळवंडे याचे शहरातील वाढते प्रस्थ खटकत असल्यानेच जुनेद शेख व त्याच्या गँगने पवनचा काटा काढला. या घटनेला चार महिन्यांचा कालावधी होतो न होतो तोच पुन्हा हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करून विकास लाखेचा खून केला. दोन्ही घटनांमध्ये गोळीबाराची घटना पाहिली तर बेछुटपणे 10 ते 12 गोळ्यांचे फायरिंग केल्याचे दिसून येते. पवन सोळवंडेवर गोळीबार झाला तेव्हा असलेले संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार होते. त्या घटनेनंतर कराड शहरात निर्माण झालेल्या गुन्हेगारी परिस्थितीमुळे कराडकर वेठीस धरले होते. सलग तीन दिवस कराड बंद असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर चर्चा सुरु झाल्याने हा ठपका पुसण्यासाठी पोलिसांनी गुंड व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावला तर भुरट्या गुन्हेगारांना व गुंडांना कायद्याचा धाक दाखवून पोलिसी खाक्या दाखविला. तर काही गुन्हेगारांच्या मुळाशी हात घालत उद्ध्वस्त करण्याचा दम भरला. त्यामुळे पवन सोळवंडेच्या खून प्रकरणानंतर गुन्हेगारी व गुंडगिरी शांत झाल्यासारखे वाटत होते.  मुख्य गुन्हेगार व त्यांच्या टोळीतील प्रमुख गुंड पोलिसांनी मोक्काची कारवाई करून कारागृहात टाकल्याने कराड व परिसरात शांतता निर्माण झाली होती. मात्र, त्याचवेळी दुसर्‍या बाजूला नवीन प्यादी पटावर उतरून चाली करत मैदान मारण्यासाठी तयार झाल्याचे पोलिसांच्या लक्षातच आले नाही. जुन्यांना जेरबंद केल्याने गँगवॉर थांबल्याची शाबासकीची थाप स्वत:च्या पाठीवर मारून घेत पोलीस वावरत होते. जुने कारागृहात गेले असले तरी त्यांचे समर्थक असलेल्यांनी नव्याने मैदानात दमदार एन्ट्री केल्याचे विकास लाखे खून प्रकरणावरून दिसून येते. त्यामुळे जुन्यांना कारागृहात पाठवित असताना नवीन गुंड किंवा गुन्हेगार निर्माण होणार नाहीत आणि निर्माण झालेच तर मैदानात येण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेचे तर आता नव्याने मैदानात उतरलेल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे नवीन आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. 

गुन्हेगारांच्या ‘पोशिंद्यां’चा बंदोबस्त गरजेचा... 
गुन्हेगारी टोळ्यांना कुणाची फुस आहे. गुन्हेगारीला खत-पाणी घालून त्यांना पोसण्याचे काम कोण करते? या बाबींचा विचार करून त्याच्या मुळापर्यंत जात ही संपूर्ण गुन्हेगारी मोडून काढण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे. गत दोन वर्षांपासून शांत असलेल्या कराड शहर व परिसराची शांतता कायम ठेवण्यासाठी व पुढील कालावधीत गुन्हेगारांनी डोके वर काढू नये म्हणून पोशिंद्यांच्या मुळावर घाव घातला पाहिजे. त्यादृष्टीने पोलिसांनी पाऊले उचलावीत. एखाद्या घटनेनंतर उपाय योजना करण्यापेक्षा अशी घटना घडूच नये म्हणून ठोस पावले उचलण्याची गरज आहे.