Sat, Feb 23, 2019 10:33होमपेज › Satara › कराड : संशयित सागर घोरपडेचा 14 व्या दिवशी मृत्यू

कराड : संशयित सागर घोरपडेचा 14 व्या दिवशी मृत्यू

Published On: Jul 13 2018 12:56PM | Last Updated: Jul 13 2018 12:56PMकराड : प्रतिनिधी 

वराडे (ता. कराड, जि. सातारा) येथे जन्मदातीसह पत्नीवर चाकू हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या संशयित सागर घोरपडे याचा शुक्रवारी सकाळी चौदाव्या दिवशी मलकापूर (कराड) येथील कृष्णा रूग्णालयात मृत्यू झाला.

गेल्या महिन्यात २९ जून रोजी रात्री नऊ वाजता सागर सदाशिव घोरपडे याने पत्नी मोहिनी घोरपडे आणि आई कल्पना घोरपडे यांच्यावर चाकू हल्ला केला होता. चाकूचे खोलवर वार झाल्याने पत्नी मोहिनी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर आई कल्पना घोरपडे यांचा कृष्णा रूग्णालयात ८ जुलै रोजी उपचारावेळी मृत्यू झाला. २९ जून रोजीच्या घटनेनंतर तातडीने कल्पना घोरपडे यांच्यासह संशयित सागर घोरपडे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरही संशयित सागर घोरपडे यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालीच नव्हती. संशयित सागर घोरपडे आपल्या कुटुंबियांसाठी का क्रूरकर्मा ठरला ? याचे उत्तर अद्यापही पोलिस तपासातून समोर आलेले नाही. 

तळबीडच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांनी सागर घोरपडे याचा दोन ते तीन वेळा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संशयित सागर बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने जबाब नोंदवणे पोलिसांना शक्य झालेले नाही. तसेच पोलिसांनी वराडे परिसरात स्थानिक ग्रामस्थांकडूनही घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस कारण पुढे आले नव्हते. त्यामुळेच संशयित सागरचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतरच घटनेमागचे कारण पुढे येईल, असे बोलले जात होते. मात्र आता संशयितांच्या मृत्यूने घटनेचे नेमके कारण पुढे येणार का? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.