Wed, Feb 26, 2020 21:42होमपेज › Satara › लोकसभा, विधानसभेला पहिल्या दिवशी भोपळा

लोकसभा, विधानसभेला पहिल्या दिवशी भोपळा

Published On: Sep 28 2019 1:27AM | Last Updated: Sep 27 2019 11:41PM
सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी 108 उमेदवारी अर्ज नेण्यात आले. पोटनिवडणूक लागलेल्या सातारा लोकसभेसाठी 8 अर्ज गेले; मात्र पितृपंधरवडा असल्याने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी एकानेही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याची चर्चा आहे. 

जिल्ह्यातील विधानसभेचे आठ मतदारसंघ तसेच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली आहे. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी लोकांमध्ये उत्साह आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सागर शरद भिसे (रा. सदर बझार) यांनी जनपरिवर्तन युवा शक्‍ती महाराष्ट्र संघाकडून स्वत:साठी 4 उमेदवारी अर्ज नेले आहेत.

प्रभाकर दत्तात्रय जानवेकर रा. सांगली यांनी राष्ट्रवादी काँगे्रसमधून 4 उमेदवारी अर्ज नेले.  सातारा -जावली विधानसभेसाठी सागर भिसे यांनी 4 उमेदवारी अर्ज नेले. हणमंत देवीदास तुपे रा. म्हसवे रोड करंजे यांनी पत्नीसाठी  तसेच वसंतराव मानाप्पा पोवार रा. यादोगोपाळपेठ सातारा यांनी  प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज नेला.  असे सर्व मिळून 6 अर्ज गेले. जिल्ह्यात मात्र पहिल्याच दिवशी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज नेले. फलटण विधानसभा मतदारसंघात 7, वाई विधानसभा मतदारसंघात 3, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 5, कराड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात 24, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 37, पाटण विधानसभा मतदारसंघात 4, माण विधानसभा मतदारसंघात 22 असे मिळून जिल्ह्यातून 108 उमेदवारी अर्ज नेण्यात आले. मात्र, या निवडणुकीच्या उत्साहावर पितृपंधरवड्याचेही सावट असल्याचे चित्र होते. काही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज नेण्यात आले. मात्र त्याप्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. त्यामुळे सोमवारनंतरच लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल  करण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे. विधानसभा मतदारसंघ व सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण कोण कोणत्या पक्षातून अर्ज दाखल करणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.