Tue, Jun 02, 2020 00:22
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › एड्स बाधित पालकांच्या मुलांना प्रवेश नाकारला

एड्स बाधित पालकांच्या मुलांना प्रवेश नाकारला

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:16PMपाटण : प्रतिनिधी

आई वडिलांचा एचआयव्हीने मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुलांना अंगणवाडीत प्रवेश नाकारण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई  करण्यात यावी, अशी मागणी सुरेश पानस्कर यांनी बुधवारी पंचायत समिती मासिक सभेत केली. सभापती सौ. उज्ज्वला जाधव अध्यक्षस्थानी होत्या. 

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड उपस्थित होते. पाटण तालुक्यात अंगणवाडीतील कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे मात्र कागदोपत्री ते कमी दाखविले जाते. मार्च महिन्यापासून आहार बिले  अदा न झाल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप सौ. रूपाली पवार यांनी केला. 

सभेत अंगणवाडी प्रकल्पाच्या कारभारावर विशेष चर्चा झाली. दोषींवर अहवाल आल्यानंतर कारवाई करू असे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. वावरे यांनी सांगितले.  तर अनुदानच नसल्याने आहाराबाबत अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन भरतीचा प्रश्‍न पंजाबराव देसाई यांनी उपस्थित केला मात्र शासनाकडूनच भरती प्रक्रिया बंद असल्याचे सांगण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवीत हाणी झाली असल्याचे पंजाबराव देसाई यांनी सांगितले. तर विजेसाठी त्याग करणार्‍या पुनर्वसीत प्रकल्पग्रस्तांच्या गावांना थ्री फेज कनेक्शन मिळू नये ही दुर्दैवाची बाब आहे. आरलला एका महिन्यात थ्री फेज कनेक्शन देण्यात यावे अशा सूचना उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केल्या. जळीत पिकांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी ही मागणी सौ. सुभद्रा शिरवाडकर यांनी केली. वीज बिले भरण्यासाठी जिल्हा बँकेने वेळ वाढवून देण्याची मागणी बबनराव कांबळे यांनी केली. ठिक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असल्याचे पंजाबराव देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. 

अनेक आरोग्य उपकेंद्र कुलूप बंद आहेत. चाफळ विभागात प्रसूत  महिलांना आरोग्य सेवा मिळत नाही उलट त्यांच्याकडूनच पैसे आकारण्यात येतात असा आरोप सौ. रूपाली पवार यांनी केला.  कोळे आरोग्य शिबिरात सत्ताधारी पक्षाचे चिन्ह असलेल्या पिशव्यातून रुग्णांना औषध वाटप करण्यात आल्याचा आरोप प्रतापराव देसाई यांनी केला.