Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Satara › शेतकर्‍याच्या संशयास्पद मृत्यूनंतरही ठेकेदाराला अभय

शेतकर्‍याच्या संशयास्पद मृत्यूनंतरही ठेकेदाराला अभय

Published On: Jun 13 2018 9:15AM | Last Updated: Jun 13 2018 12:28AMसातारा : प्रतिनिधी

पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील  खंडोबाचा माळ येथील वाळूच्या औटीवर वृद्ध हैबत गुजर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेकडे याबाबत आर्जव करूनही संबंधितांवर कारवाई न झाल्याने उलट वाळू ठेकेदारालाच अभय दिले गेल्याने मृताचे नातेवाईक उपोषणाच्या पवित्र्यात आले आहेत. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांना निवेदन दिले असून वाळू ठेकेदारासह त्याच्या साथीदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. 

जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  2 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी साडेतीन वाजता आमच्या मालकीच्या गट नं. 430 मध्ये राहत्या घराजवळ खंडोबा माळ शिवारात वाळू ठेकेदार मनोज पाटील (सातारा) याच्याकडे कामासाठी असणार्‍या बकेटखाली चिरडून हैबती गुजर (वय 74) यांचा मृत्यू झाला असून हा घातपात आहे. वसना नदीपात्रातून बेकायदेशीरपणे रात्रंदिवस वाळू उपसा सुरू होता. आमच्या मालकीच्या शेतजमिनीतून खासगी रस्त्याने त्यांची वाहने दररोज ये-जा करत होती. 

त्यास हैबती गुजर यांचा विरोध होता. सदरच्या रस्त्यास नदीवरील बंधारा बांधण्यासाठी आम्ही सहमती दिलेली होती. परंतु वाळू ठेकेदार दांडगाईने व धमकी देऊन या रस्त्याचा वापर वाळू वाहतुकीसाठी करत होता. दररोज ट्रक व ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केजी जात होती. प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. 2 ऑक्टोंबर 2017 रोजी खंडोबाचा माळ याशिवारात  आमच्या मालकीच्या राहत्या घराजवळ  जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरु होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हैबत गुजर हे शेतात जाण्यासाठी निघाले असता जेसीबी वाहनाचे बकेट (सूप) अंगावर पडले. लगत उभे असणार्‍या लोकांनी ओरडून वाहनचालकास वाहन थांबवण्यास सांगितले. त्यानंतर घरातील लोकही धावत जेसीबीजवळ आले. हैबत गुजर जागेवर बेशुध्द पडले होते. त्यांच्या अंगावर जेसीबी बकेट तसेच पडलेले होते.  ही जेसीबी (क्र. एमएच 11 बीझेड 477) सचिन शंकर सणस (रा. लिंब, ता. सातारा) यांच्या मालकीची असून त्याच्यावर राजेंद्र धोंडिबा बागडे (रा. लिंब, ता. सातारा) हा चालक होता. तो मनोज पाटील व त्याच्या सहकार्‍यांच्या वाळू ठेक्यावर काम करत होता. 

वाठार स्टेशनचे पोलिस अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या हलगर्जीपणामुळे हैबत गुजर यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित ठेकेदाराकडून धमक्या दिल्या जात आहेत.  न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा  रुक्मिनी हैबत गुजर, नंदकुमार गुजर, बालिशराव गुजर, मंदिकिनी गुजर, जयश्री गुजर, नितीन गुजर, रेश्मा गुजर, प्रियंका गुजर, प्रतीक्षा गुजर यांनी दिला आहे.