सातारा : प्रतिनिधी
उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे पुढे येत असली तरी आम्ही योग्य तो निर्णय घेवूनच राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत सक्षम उमेदवार देवू. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अनेकांचा भमनिरास झाला आहे. त्यामुळे अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास तयार आहेत. ते पुन्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सातार्यात पत्रकारांशी बोलताना केला.
शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सातार्यातील राजकीय वातावरणाबाबत पदाधिकार्यांशी बोललो आहे. सातार्यात अनेक कार्यकर्ते सक्षम आहेत. सर्वांशी विचारविनिमय करून योग्य तो उमेदवार पक्षामार्फत दिला जाईल.
लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांची नावे पुढे येत असल्याच्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, अशी जाहीरपणाने चर्चा करणे योग्य नाही. आम्ही योग्य उमेदवार देवू. प्रत्येक मतदारसंघातील राजकीय वातावरण व परिस्थितीवर कोणास उमेदवारी द्यावयाची ते अवलंबून आहे. शरद पवार रात्रंदिवस फिरत आहेत. त्यांना मोठा जनाधार मिळू लागला आहे. राष्ट्रवादीला ताकद देण्याचे काम अनेक ठिकाणांवरून सुरू आहे. सत्तेत असताना सर्वांचीच कामे केली आहेत. कामे होणे महत्वाचे नाही तर विचार जुळणे महत्वाचे आहे. वंचित व आमची आघाडी होण्याची शक्यता नाही. मात्र वंचितचे काही पदाधिकारी राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या नेत्यांना भेटायचा प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.
दिपक पवारांच्या प्रवेशाबाबत बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, भाजपाने प्रवेश केलेल्या अनेकांची अशीच हालत केली आहे. दिपक पवार अजून भाजपामध्ये आहेत त्यांनी फक्त मत व्यक्त केले आहे. परंतू पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्याशिवाय उमेदवारी कशी फायनल करणार? असा प्रश्नही त्यांनी केला. आमच्याकडे भाजपासारखे दरवाजे खुले नाहीत. पदाधिकार्यांशी बोलून काय तो निर्णय घेवू. पवारसाहेब 22 रोजी सातार्यात आहेत. त्यावेळीच दीपक पवारांचा राष्ट्रवादी प्रवेश करायचा अशी काहींची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
खा.शरद पवार यांच्या दौर्याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. खा. शरद पवार हे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे सहानुभुती व ताकदीने उभे रहावयाची इर्षा
मिळत आहे. येत्या 8 ते 10 दिवसात महाराष्ट्रात चित्र बदललेले दिसेल. ज्यांनी पक्ष बदलला आहे त्यांना पश्चाताप होत आहे. शिकार करून खाणार्यांची आमची औलाद असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले असल्याबाबत बोलताना आ.जयंत पाटील म्हणाले, माझ्या वाचनात काही अशी टिपण्णी आली नाही. त्यामुळे ते काय बोलले हे मला माहित नाही.
सातार्यातही शरद पवारांची रॅली निघणार
राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर आ. शशिकांत शिंदे यांचीही पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलताना आ. शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दि. 22 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने सातार्यात येणार आहेत. याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉलमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कार्यालयापासून पोवईनाक्यावर कार्यकर्ते रॅली काढणार आहेत. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ही रॅली सिव्हील हॉस्पिटल रोड मार्गे जिल्हा परिषदेच्या हॉलकडे जाणार आहेत. शरद पवार यांच्या उमेदवारीची चर्चा होत असली तरी याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी याबाबत निर्णय घेणार आहेत. मात्र, बरीच नावे चर्चेत आहेत. अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. उदयनराजेंनी पक्षांतराचा निर्णय घ्यायला नको होता. त्यांना युती सरकारबद्दल लोकांच्या मनात असलेला रोष निश्चित दिसेल.