Fri, Jun 05, 2020 23:43होमपेज › Satara › निगडी शनी मारुती मंदिरात आजपासून दुर्गाउत्सव(व्हिडिओ)

निगडी शनी मारुती मंदिरात आजपासून दुर्गाउत्सव(व्हिडिओ)

Published On: Oct 10 2018 9:56AM | Last Updated: Oct 14 2018 5:22PM
कराड : प्रतिनिधी

कराड तालुक्यातील निगडी येथील पेशवेकालीन शनि मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दुर्गा उत्सव सुरू होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील दुर्गा उत्सव साजरे करणारे हे एकमेव मंदिर असावे. महादजी शिंदे यांचे चिटणीस यांनी बांधलेले हे पेशवेकालीन मंदिर असून वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर पाहण्यासाठी व मारुतीच्या दर्शनासाठी विविध भागातून भाविक येत असतात.

स्वराज्याचे पराक्रमी सरदार महादजी शिंदे यांचे चिटणीस निगडीत वास्तव्यास होते. सुमारे दोन एकरात त्यांचा वाडा होता. आज या वाड्याची दूरवस्था झाली  आहे. केवळ बाहेरून वाड्याचा भव्य दरवाजा पाहता येतो .दरवाजावरूनच वाडा किती भव्य असेल  याची कल्पना येते. वाड्यापासून सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावरच ऐतिहासिक  हनुमान मंदिर आहे. 

17 व्या दशकातील हे हनुमान मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. संपूर्ण पाषाणात उभारलेले पश्‍चिम मुखी मंदिर आहे. महादजी शिंदे यांच्या चिटणीसांनी हे मंदिर बांधले आहे. आज मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे, त्याठिकाणी चिटणीसांचा तळे बांधण्याचा मानस होता. 

त्यासाठी काम सुरू केल्यानंतर एक हनुमानाची स्वंयभू मूर्ती सापडली आणि या मूर्तीमधून रक्तस्त्रावही झाला. त्याच रात्री चिटणीसांना दृष्टांत झाला की तळ्याऐवजी मंदिर उभारा आणि गावच्या दक्षिण बाजूला तळे बांधा. त्यापद्धतीने तळ्याचे दक्षिण बाजूला अस्तित्व आहे. तर पश्‍चिम महाराष्ट्रातील एकमेव शनि मारूतीचे मंदिर पश्‍चिम मुखी आजही मोठ्या दिमाखात उभे आहे. मंदिराच्या सभोवताली शिवकालीन बांधकाम असून मंदिरात पश्‍चिम बाजूला आवारात दोन दीपमाळा आहेत. 

एकाच पाषाणात तयार केलेल्या या दीपमाळा घडवलेल्या आहेत. नवरात्र उत्सावावेळी याठिकाणी तेल वात अखंडपणे तेवत ठेवली जाते. तसेच 17 व्या शतकांपासून भानू नावाची परंपराही जोपासली जात असून स्पृश - अस्पृश्य असा भेदभाव न करता पाच लोकांना श्रींच्या नावाने भोजन दिले जाते. शेकडो वर्षापासून समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र भोजन करतात.आजही ही परंपरा मनोभावे जोपासली जाते. मंदिराच्या दक्षिण बाजूला भव्य तळे उभे आहे. या तळ्यात हत्ती, घोडे पाणी पिण्यासाठी आणले जात होते. या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष झाले आहे. विहिरीच्या भिंतीवर झाडेझुडपे उगवल्याने भिंतीचे दगड निसटू लागले आहेत. 

हनुमंताच्या पायाशी शनी..!
मंदिरात महारूद्र हनुमानाच्या पायात शनिची मूर्ती आहे. या मंदिरात येऊन भक्तीभावाने दर्शन घेणार्‍या, पूजाअर्चा करणार्‍या लोकांना शनिपासून कोणताही त्रास होणार नाही, अशी याठिकाणी भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्येक शनिवारी लोकांची दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी असते. त्याचबरोबर नवरात्र उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्र उत्सावात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी अत्यंत कडक पद्धतीने साजरा होता.