Tue, Jul 23, 2019 06:41होमपेज › Satara › मोदी यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प: राज ठाकरे

मोदी यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प: राज ठाकरे

Published On: Feb 01 2018 4:16PM | Last Updated: Feb 01 2018 10:39PMसातारा : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीला 2014 च्या निवडणुकांमध्ये जे वातावरण होते ते वातावरण आता त्यांना दिसत नाही. त्यामुळे केंद्रात व राज्यात होणार्‍या आगामी निवडणुकांमध्ये भाजपा सत्तेवर येणार नाही, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान,  एकदा माझ्याकडे सत्ता देवून तर बघा, सत्ता कशी राबवायची असते ते दाखवून देतो, असे आवाहनही त्यांनी केले.

मनसे पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यासाठी राज ठाकरे सातार्‍यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना  राज ठाकरे म्हणाले, गुजरातमध्ये मी गेलो असता त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी माझ्यासमोर वेगळे चित्र निर्माण केले. मात्र, हे सर्व खोटे आहे. भाजपाने काहीही विकास केला नाही. हे गुजरातच्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपा सत्तेवर येणार नाही. आता पुढील सहा महिन्यात आणखी जातीय दंगली होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्‍त केली. संपूर्ण महाराष्ट्रात  अस्वस्थता पसरली आहे. आज कोणताच घटक सुखी दिसत नाही. जनतेला बदल हवा आहे. त्यासाठी एकवेळ महाराष्ट्राची सत्ता एकदा या राज ठाकरेच्या हातात देवून बघा, तुमची सर्व  घुसमट थांबेल, असे सांगून  राज ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र बिघडला असताना सातार्‍याचे काय घेवून बसलाय? जनतेला जो बदल हवा आहे तो अगामी निवडणुकीत पहायला मिळणार आहे.  गुजरातमधील विकासाच्या खोट्या प्रतिमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत हे मी नेहमी म्हणतो. ते देशाचे पंतप्रधान आहेत असे मी मानत नाही. कारण बाहेरील देशातील  पंतप्रधान  व परदेशी व्यक्ती देशाच्या दौर्‍यावर आले की मोदी हे अहमदाबाद येथे घेवून जावून गुजरातचे कौतुक करतात. त्यांना देशातील अन्य राज्ये व शहरे का दिसत नाहीत? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश सारख्या राज्यात विकास झाला नाही का? असा सवालही राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची आपण मुलाखत घेणार आहात. या मुलाखतीमध्ये कोणते मुद्दे व प्रश्‍न तुमचे असणार आहेत? असा प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारला. मात्र, त्याला राज ठाकरे यांनी बगल दिली. पश्‍चिम महाराष्ट्रात संस्थांनिकांचे राजकारण असल्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात संस्थांनिकांचे राजकारण असते तर विनय कोरे का पडले? त्यांनीही मोठी विकासकामे केली आहेत. कितीही विकास करा विकासकामावर राजकारण चालत नाही. असे चित्र राज्यात आहे.