Thu, Apr 25, 2019 17:43होमपेज › Satara › कास तलावाला प्रतापसिंह महाराजांचे नाव

कास तलावाला प्रतापसिंह महाराजांचे नाव

Published On: Apr 08 2018 2:19AM | Last Updated: Apr 07 2018 10:55PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरास मुबलक पाणीपुरवठा व्हावा व भविष्यातील 25-30 वर्षांची पाण्याची चिंता दूर करण्यासाठी कास धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सातार्‍याला कण्हेर धरणातूनही पाणी आणण्यासाठी वाट्टेल ते करणार असून कोण काय म्हणतं याच्याशी देणं-घेणं नाही. कास तलावाची निर्मिती करुन सातार्‍यात प्रशस्त रस्ते बांधणार्‍या श्री. छ. प्रतापसिंह महाराजांचे नाव कास तलावास द्यावे, अशी इच्छा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्‍त केली.

कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाला.  त्यावेळी पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विलास रजपूत, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, अशोक सावंत, अ‍ॅड. डी. जी. बनकर, माजी शिक्षण सभापती अमित कदम,  स्मिता घोडके, विवेक जाधव, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, नगरसेवक राजू भोसले, वसंत लेवे, प्रतोद निशांत पाटील प्रमुख उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, सर्वजण कासला एवढ्या लांब आल्याचे समाधान वाटते. कास तलावासाठी इथल्या स्थानिक लोकांनी जीव ओवाळून टाकला. या तलावाची उंची वाढवण्यासाठी मी निमित्त मात्र असलो तरी हे काम तुम्हा सर्वांमुळे शक्य झालं. तलावाची उंची वाढवल्यामुळे सातारकरांना पाणीटंचाई भेडसावणार नाही. सातारा शहरास आणखी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कण्हेर धरणातून पाईपलाईन करणार आहे. पण हे काम करत असताना कधी-कधी खंतही वाटते. राजकारणात पॉझिटिव्ह-बिझिटीव्ह असा विचार न करता माणूस म्हणून काम करतो. सोनगाव कचरा डेपोवर घनकचरा प्रकल्पाचे काम सुरु आहे. कोण काय म्हणतं याचा विचार न करता मी लोकांसाठी काम करत राहणार आहे. प्रसिध्द लेखक पु.ल.देशपांडे यांच्या ‘असा मी असामी’ या पुस्तकातल्या व्यक्‍तिरेखेसारखा मी आहे. कास धरण उंची वाढवण्याच्या कामाचे श्रेय घ्यायला मी मोकळा नाही. पण श्री. छ. प्रतापसिंह महाराजांनी हा तलाव  आणि  सातार्‍यातील रस्ते बांधले. त्यांचे नाव या तलावाला द्यावेसे वाटते. कुणाचे काय मत असेल तर सांगावे, असेही खा. उदयनराजे म्हणाले.

अमित कदम म्हणाले, स्थानिकांनी खा. उदयनराजेंच्या हाकेला साथ देवून मदत केली. त्यांचा गावठाण आणि पाणीप्रश्‍न सोडवावा. सातार्‍यात विकास होत नाही अशी टीका करणार्‍यांना खा. उदयनराजेंनी विविध प्रकल्प राबवून उत्‍तर दिले असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. 

अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले,  सातारा शहरात भुयारी गटर योजना राबवण्यापूर्वी विस्तारीत पाणीपुरवठा योजना करणे गरजेचे आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. कामाच्या कालावधीत पावसामुळे बरेच दिवस वाया जाणार असल्याने कंत्राटदारांनी कामात गती ठेवावी. खा. उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली साविआने दीड वर्षांतच आश्‍वासनपूर्ती केल्याचेही बनकर यांनी सांगितले.शंकर गोरे म्हणाले, कास तलावासाठी स्थानिक लोकांनी त्याग केला. त्यांच्या गावठाणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची वेळ घेवून बैठक घेतली जाईल. तलावाचे उंची वाढवण्याचे काम पूर्ण होताच 15 गावांनाही पिण्यासाठी पाणी दिले जाईल. खा. उदयनराजे यांच्या सहकार्याने ग्रामस्थांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावा करु, असे सांगितले. प्रास्तविक श्रीकांत आंबेकर यांनी केले. यावेळी आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, कास ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags : satara, satara news, Kas Talavala, Pratapsingh Maharaj, name, Udayanraje Bhosale,