Sun, Jul 05, 2020 07:15होमपेज › Satara › ‘नगराध्यक्षा दारी’अभियान गुंडाळले

‘नगराध्यक्षा दारी’अभियान गुंडाळले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

नगरपालिकेत नवीन सत्ता येऊन नुकतीच त्याची वर्षपूर्तीही  झाली. नवे राज्य, नवे सरकार यानुसार नव्या सत्ताधार्‍यांकडून नागरिकांना प्रचंड अपेक्षा होती. नव्या नवलाईचे दिवस संपून जनतेकडे लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा असताना मात्र पालिकेतील अनेक कुरघोडींमुळे  ‘त्यांचे त्यांनाच होईना... मग जनतेकडे कधी बघणार?’ अशी अवस्था पदाधिकार्‍यांची झाली आहे. त्यातच नगराध्यक्षांचा ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ उपक्रम बंद झाल्याने नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे कोणाच्या दबावाखाली आहेत काय? अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये आहे. 

वर्षभरापूर्वी पालिकेच्या निवडी होवून नवनवीन चेहरे सत्तेत आले. मोठ्या अपेक्षेने नागरिकांनी नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांच्या नव्या चेहर्‍यांना संधी दिली. मात्र सुरूवातीसच तत्कालिन मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना हटवण्यासाठी सर्वजण एकत्रित आले. औंधकर  यांची बदली झाल्यावर विकासाच्या गप्पाही एकत्रित येवून होतील अशी अपेक्षा जनतेला असतानाच भाजपा, जनशक्‍ती यांच्यामध्ये अंतर्गत वाद, मतभेद सुरू झाले.

त्यानंतर याचे रूपांतर वादावादीत होवून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. त्यातच नगराध्यक्षा यांनी ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ हा उपक्रम दर मंगळवारी सुरू केला त्याला नागरिकांतून उत्स्फुर्त प्रतिसादही मिळाला. मात्र गेल्या दोन आठवड्यात हा उपक्रम बंदही पडला की काय? अशी विचारणा नागरिकांतून होत आहे. दि. 31 ऑक्टोंबर रोजी  मंगळवारी पालिकेत विशेष सभेचे आयोजन केले होते मात्र ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ हा उपक्रम असल्याने सौ. शिंदे यांनी 30 ऑक्टोबर रोजीच प्रभागांना भेटी दिल्या होत्या. मात्र त्यानंतर गेल्या तीन ते चार मंगळवारी नगराध्यक्षा नागरिकांच्या दारी गेल्या नाहीत. त्यामुळे हा उपक्रम मध्येच का खोळंबला असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

नगराध्यक्षांचा हा उपक्रम काही पदाधिकार्‍यांना रूचला नसल्याचेही बोलले जाते. मात्र असे असले तरी त्या नागरिकांतून निवडून आल्या आहेत. त्यांनी नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नागरिक करत असताना त्यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी  उपक्रम बंद केला. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे काय? त्या अंतर्गत कुरघोडींमुळे त्यांनी हा उपक्रम बंद केला की काय ? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.