Wed, Jul 24, 2019 06:21होमपेज › Satara › दारू कमी दिल्याच्या कारणाने सातार्‍यात मित्राचा निर्घृण खून

दारू कमी दिल्याच्या कारणाने सातार्‍यात मित्राचा निर्घृण खून

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 10:15PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या इमारतीखाली असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये शनिवारी मध्यरात्री राजेंद्र बबन सूर्यवंशी (वय 45, रा. घोरपडे कॉलनी, केसकर पेठ, सातारा) यांचा मित्रानेच डोक्यात तीक्ष्ण हत्याराने गंभीर वार करून निर्घृण खून केला. दारू कमी दिली व जुन्या वादाच्या संशयाच्या कारणातून हा खून झाला असून, याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. युवराज ऊर्फ बाबू रामचंद्र भोसले (वय 34, रा. केसरकर पेठ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या 7 तासांत घटनेचा पर्दाफाश केला. 

रविवारी सकाळी सातारा नगरपालिकेच्या शॉपिंग मॉल सेंटरमध्ये  एकजण मृतावस्थेत पडला असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची चर्चा सातार्‍यात वार्‍यासारखी पसरल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. स्थानिक गुन्हे अन्वेषण, शहर पोलिस यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता मृतदेह अंथरुणावर पडला होता. अज्ञाताचा धारदार शस्त्राने खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाशेजारी दारूच्या बाटल्या आणि जेवणाच्या पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत होत्या. तो मृतदेह राजेंद्र सुर्यवंशी यांचा असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्‍वान पथकाने रस्त्यापर्यंत माग काढला, मात्र त्यानंतर ते तिथेच घुटमळले. एलसीबीच्या पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली. खुनाची घटना सकाळी समोर आल्यानंतर दिवसभर त्याबाबत सातार्‍यात चर्चा सुरु होती. दिवसभर खूनाचे गूढ असतानाच एलसीबीला अवघ्या 7 तासात खुनाचा छडा लावण्यात यश आले. संशयित बाबू भोसले व मृत राजेंद्र सुर्यवंशी हे मित्र होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दोघे झोपण्याच्या ठिकाणी आले. झोपण्यापूर्वी आणलेल्या दारुवरुन त्यांचा वाद झाला. संशयिताला दारु कमी मिळाल्याने वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यावेळी संशयिताने धारदार शस्त्राने सुर्यवंशी यांच्यावर वार केला व  तो पसार झाला. अखेर सायंकाळी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. 

पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक  डॉ. खंडेराव धरणे, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड, हवालदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, उत्तम दबडे, मुबीन मुलाणी, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

खुनाचे दुसरे कारण ‘पहिला खून..?’

संशयित बाबू भोसले याच्या भावाला गेल्या सहा महिन्यांपूर्वी केसरकर पेठेतील वृद्ध महिला आशालता खैरमोडे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. खैरमोडे यांचा खून झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला कोणत्याही संशयिताला अटक केली नव्हती. सुमारे 1 महिन्यानंतर त्यातील संशयिताला अटक केली होती. खैरमोडे यांच्या खुनाची माहिती राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिल्यामुळे आपल्या भावाला अटक झाल्याचा संशय बाबू भोसले याला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये कमी दारू दिली म्हणून, तसेच खैरमोडे यांच्या खुनाची माहिती सूर्यवंशी यानेच दिल्याचे कारण असल्याचे समोर येत असून, पोलिस त्याबाबत चौकशी करीत आहेत.