Sat, Apr 20, 2019 18:26होमपेज › Satara › सातारा : नगरपालिकेजवळ एकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून

सातारा : नगरपालिकेजवळ एकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून

Published On: Mar 11 2018 12:01PM | Last Updated: Mar 11 2018 2:25PMसातारा : प्रतिनिधी

येथील राजपथावरील नगरपालिकेच्या परिसरात एका व्‍यक्‍तिचा  खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र बबन सुर्यवंशी(वय 40)  असे मृताचे नाव असून तो रा. घोरपडे कॉलनी, केसकरपेठ येथील रहिवाशी होता. अज्ञात व्यक्तीने राजेंद्र याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केले आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुन्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान पथक पालिकेच्या मुख्य रस्त्यापर्यंत माग काढून तेथेच घुटमळले. 

माहीत मिळताच घटनास्थळी पो. उपधिक्षक धरणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. नि. पद्माकर घनवट, सहा. पो. नि. प्रसन्न जर्हाड, शहर पोलिस ठाण्याचे पो. नि. सारंगकर आणि पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. 

सातारा नगर पालिकेने नव्याने बांधलेल्या तळघरातील गाळ्यांमध्ये राजेंद्र सुर्यवंशीचा मृतदेह अंथरूणावर आढळून आला. त्याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने तीक्ष हत्याराने गंभीर वार केल्याने रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर उडालेल्या होत्या. मृतदेहाच्या शेजारी दारूच्या बाटल्या आणि जेवणाच्या पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत होत्या. खून करून फरारी झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले . श्वान पथकाला त्या मृतदेहाचा वास आणि शेजारी पडलेल्या अन्य वस्तुंचा वास दिल्यानंतर श्वान पथक मृतदेहाच्या परीसरात फिरत राहिले. त्यानंतर पुन्हा ते नगर मुख्य रस्त्याकडे पळत गेले. रस्त्यावरून पुन्हा मृतदेहाजवळ आले आणि त्याच ठिकाणी घुटमळत राहिले.

ठसे तज्ञ अनिल कोळी यांनी मृतदेहाशेजारी पडलेल्या वस्तुंवरचे ठसे घेतले. मयत राजेंद्रच्या खिशात डायरी मिळून आली. मयत राजेंद्र हा पालिकेपासून हाकेच्या अंतरावर जवळच असलेल्या घोरपडे कॉलनीत रहात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीसांनी त्याच्या कुटूंबीयांशी संपर्क साधला. यावेळी त्याचा भाऊ शेखर बबन सुर्यवंशी याने मयत आपला भाऊ असल्याचे सांगीतले. दरम्यान राजेंद्र सुर्यवंशीचा खुन नेमका कोणत्या कारणाने झाला. याचे कारणही अद्यापही पोलीस यंत्रणेला समजले नाही. राजेंद्र हा पेंटरचे काम करतो. त्याचा कुणाशी संबध आहे हे तपासण्याचे काम सुरू आहे. खुनाच्या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

दरम्यान, याबाबत घटनास्थळी मयत राजेंद्र सुर्यवंशी याचा भाऊ शेखर सुर्यवंशी याने पत्रकारांना माहिती दिली. ‘राजेंद्र हा माझा मोठा भाऊ आहे. त्याची पत्नी त्याला सोडून पाच ते सहा वर्षापासून माहेरी मुलांसह रहात असते. राजेंद्र हा पेंटरचे काम करतो. गेले 5 ते 6 वर्षापासून तो रात्री घरी न झोपता नगर पालिकेच्या इमारतीखाली असलेल्या गाळ्यांमध्ये झोपण्यास जात असतो, असे शेखर यांनी सांगितले. तसेच, जेंद्र सोबत सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात झाडलोट करणारा राजा नावाचा (पूर्ण नाव नाही) इसमही झोपतो. रात्रीच्यावेळी मयत राजेंद्र घरातून झोपण्यास जातो असे सांगून गेला होता, असेही त्यांनी सांगितले.