होमपेज › Satara › सातारा : जेवणाचा डबा खाल्ल्याने खून

सातारा : जेवणाचा डबा खाल्ल्याने खून

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 19 2018 1:58AMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील रविवार पेठेतील आकार हॉटेलच्या पाठीमागे असणार्‍या भाजी मंडईत बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जेवणाचा डबा खाल्ल्याच्या रागातून हमाल मच्छिंद्रनाथ बळवंत कदम (वय 50, मूळ रा. कदम आव्हाड वस्ती, पो. मुंद्रुळ कोळे, ता.पाटण) यांचा त्याच्या मित्रानेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. याप्रकरणी संशयित  हमाल उमेश भानुदास जाधव (रा. खराडे, ता. कराड) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोवईनाक्यावर  आकार हॉटेलच्या पाठीमागे भाजीमंडई आहे. हमाल लोक हमाली करुन रात्री तेथेच  असणार्‍या निवार्‍यात झोपी जातात. बुधवारी रात्री मच्छिंद्रनाथ कदम यांनी उमेश जाधव यांचा जेवणाचा डबा खाल्‍ला व ते झोपी गेले. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जाधव याला कदम यांनी जेवणाचा डबा खाल्याचे समजल्यानंतर तो कमालीचा चिडला. दोघांचा वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर जाधव याने कदम यांच्या डोक्यात मोठा दगड घातला.     

त्यामुळे रक्‍तबंबाळ झालेल्या मच्छिंद्रनाथ कदम यांनी बचावाचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ ठरला. ते रक्‍ताच्या थारोळ्यात पडले. हा प्रकार समजताच सुरक्षारक्षकासह अनेकजण घटनास्थळी धावले.  त्यावेळी संशयित जाधव हा तेथून पसार झाला. कदम यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते निपचीत पडले होते. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. 

सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.  संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. 
या पथकामध्ये सहाय्यक फौजदार राजू शेख, पोलिस हवालदार अविनाश चव्हाण, पंकज ढाणे यांचा समावेश होता. अवघ्या काही तासातच संशयित उमेश जाधव याला अटक करण्यात आली.  न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पुढील तपास फौजदार एस.बी.जाधव करत आहेत.

जमावाला पाहताच संशयित पळाला..

हमाल निवासस्थानाजवळ ओरडण्याचा आवाज आल्यानंतर सुरक्षारक्षक नवराज मनबहद्दर काझी (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी सहकार्‍यांसोबत धाव घेतली. त्यावेळी संशयित उमेश जाधव हा घटनास्थळी होता. जमाव जमल्याचे पाहताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणाची पोलिस ठाण्यात काझी यांनीच तक्रार दिली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार संशयिताने कदम यांच्या तोंडावर सुमारे दोन ते तीन वेळा दगडाने मारहाण केली आहे.