Thu, Apr 25, 2019 15:33होमपेज › Satara › बक्षिसी वाटपावरून वाढप्याचा खून

बक्षिसी वाटपावरून वाढप्याचा खून

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 11:15PMकुडाळ : प्रतिनिधी

लग्‍नकार्यात बक्षीस स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून वाढप्यांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यवसान खुनात झाले. कुर्‍हाड व कोयत्याने वार करून वाढप्यांनीच वाढप्याचा काटा काढल्याची घटना जावली तालुक्यातील सोनगाव येथे मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन सख्ख्या भावंडांसह त्यांच्या आई-वडिलांनाही अटक केली आहे. 

राहुल मेंगळे (वय 35) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अटक केलेल्या संशयितांमध्ये मोहन सुखदेव मेंगळे, अनिल मोहन मेंगळे, विशाल मोहन मेंगळे, सनी मोहन मेंगळे व नंदा मोहन मेंगळे (रा. सोनगाव, ता. जावळी) यांचा समावेश आहे.

मंगळवारी पार पडलेल्या एका लग्‍न सोहळ्यात सर्व आरोपी व मृत व्यक्‍तीचा भाऊ विश्‍वनाथ मेंगळे हे वाढपी म्हणून गेले होते. यावेळी त्यांना एक हजार रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले होते. हे पैसे कोणालाच द्यायचे नाही, यावरून मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास विश्‍वनाथ मेंगळे व त्याचा भाऊ राहुल मेंगळे यांना या सर्वांनी धक्‍काबुक्‍की करत मारहाण केली.

हा वाद विकोपाला गेल्याने सनी मेंगळे याने विश्‍वनाथ मेंगळे यांच्या डोक्यात खोरे मारून त्यांना जखमी केले. यानंतर अनिल मेंगळे याने राहुल मेंगळे याच्यावर कुर्‍हाड व कोेयत्याने वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.गंभीर जखमी अवस्थेत राहुलला तातडीने  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन पाचही आरोपींना अटक केली. यापैकी तिघे शिवारात तर दोघे घरातील माळ्यावर लपून बसले होते. विश्‍वनाथ मेंगळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने तपास करत आहेत.