Sat, Apr 20, 2019 10:06होमपेज › Satara › विवाहाच्या तगाद्यामुळेच बानूचा खून

विवाहाच्या तगाद्यामुळेच बानूचा खून

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 21 2018 1:04AMवाई : प्रतिनिधी

मांढरदेव घाटात निर्घृणपणे खून झालेल्या तरुणीची ओळख पटली असून, विवाहाचा तगादा लावल्यामुळेच तिचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्रियकरासह तिघांना अटक करण्यात आली आहे. एका लॉजवरील सीसीटीव्ही फुटेजवरून एलसीबीच्या पथकाने या खून प्रकरणाचा अवघ्या चार दिवसांत छडा लावला. 

खून झालेल्या महिलेेचे नाव बानू गोपाळ कोकरे (मूळ रा. जळभावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर नाथा दादा लवटे (रा. मेडत, ता. माळशिरस, जि. सोलापूर), त्याचे साथीदार अजय अशोक धाईंजे, रवींद्र धुळा शेंडगे (दोघेही रा. मांडकी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पाच दिवसांपूर्वी  वाईजवळील मांढरदेव घाटात गाढवेवाडी गावच्या हद्दीत माल वाठार शिवारात डोंगर पठाराजवळील ओघळीत 24 वर्षीय महिलेचा धारदार हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह रस्त्यापासून लांब टाकण्यात आला होता. 

घटनास्थळी खुनाचे धागेदोरे तपासण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही पुरावा सापडला नव्हता. या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानुसार वाई पोलिसांनी मृतदेहाच्या बोटांचे ठसे घेऊन आधारकार्डवरून ओळख शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र बराच प्रयत्न करूनही ओळख पटू शकली नव्हती. गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी मांढरदेव परिसरातील सर्व लॉजवरील व संबंधित ठिकाणांच्या  दोन दिवसांतील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी केली. यादरम्यान नाथा लवटे व बानू कोकरे हे एका लॉजवर थांबल्याचे निष्पन्‍न झाले. या लॉजच्या रजिस्टरवरून पोलिसांना या दोघांची नावे व मोबाईल क्रमांक मिळाले. 

या दोन गोष्टींवरून पोलिसांनी तपासाची दिशा नक्‍की केली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून नाथा लवटेच्या तपासासाठी नालासोपारा आणि माळशिरस येथे पथके रवाना केली. पो. नि. विनायक वेताळ यांच्या नेतृत्वाखालील टीमने सलग तीन दिवस मुंबई आणि नालासोपारा, पालघर परिसर पिंजून काढला. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करत असताना लवटे हा पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान रात्रीच्या वेळी नालासोपारा येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने नाथा  लवटे यास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

लवटे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, गोपनीय माहिती नुसार मृत महिलेच्या मुंबईतील राहत्या घराचा पत्ता पोलिसांना लागला. त्यानुसार लवटे याला पोलिसांनी मृत महिलेच्या मुंबईच्या वरळी, कोळीवाडा येथील घराजवळ नेऊन चौकशी केली असता मृत महिलेचे नाव बानू गोपाळ कोकरे (मूळ रा. जळभावी. ता. माळशिरस, जि. सोलापूर) असल्याचे निष्पन्‍न झाले. तसेच लवटे हा तिचा पती असल्यासारखे वावरत होता, असे आजूबाजूच्या महिलांनी सांगितले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच लवटे याने अजय धाईंजे आणि रविंद्र शेंडगे  यांच्या मदतीने हा खून केल्याचे कबूल केले. 

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी माळशिरस येथून अजय व रविंद्र यांना अटक केली. पोलिसांना दिलेल्या जबाबात लवटे याने सांगितले की, त्याचा विवाह झाला असतानाही नात्यातील बानू कोकरे हिच्याबरोबर त्याने प्रेमसंबंध ठेवत वरळी, मुंबई येथे भाड्याची खोली घेऊन गेल्या दीड वर्षांपासून त्याने दुसरा संसार थाटला होता. बानू हिने यादरम्यान सतत त्याच्याकडे विवाहासाठी तगादा लावला होता. आधीच विवाहित असल्याने आपल्या संसारात बानूचा अडथळा खटकत होता. त्यामुळे गुन्ह्याचा कट रचून शनिवारी बानूला मुंबईहून मांढरदेवला आणले. याचवेळी मित्र अजय धाईंजे व रविंद्र शेंडगे यांना माळशिरस येथून मांढरदेवला बोलावून घेतले. शनिवारी सायंकाळी बूनला एस. टी. ने माल वाठार परिसरात आणले. त्याचवेळी अजय व रविंद्र तेथे पोहचले. नाथाला त्रास देऊ नकोस असे सांगत त्या दोघांनी बानूला लघुशंकेच्या बहाण्याने पठाराकडे नेले. यानंतर बानूचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने काही अंतरावरील घळीत मृतदेह ओढत नेऊन टाकण्यात आला. 

या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, पो. नि. विनायक वेताळ, सहाय्यक फौजदार त्रिंबक अहिरेकर, पो.ना. जितेंद्र शिंदे, पो.ना. प्रशांत शिंदे, पो.कॉ. विक्रमसिंह कणसे, पो.कॉ. कांताराम बोर्‍हाडे, पो.कॉ. सोमनाथ बल्‍लाळ, पो.कॉ. सुर्यकांत कुडवे, पो.कॉ. सचिन ससाणे यांच्या टीमने ही मोहीम फत्‍ते केली.  या टीमचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले.