Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Satara › कराड : वृक्ष तोडीमुळे पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे (व्हिडिओ)

कराड : वृक्ष तोडीमुळे पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे (व्हिडिओ)

Published On: Jan 18 2018 2:18PM | Last Updated: Jan 18 2018 2:18PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 
येथील कोल्हापूर नाका परिसरातील स्व.यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वारानजीकचे पिंपळ आणि वडाचे झाड तोडल्याने लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, पर्यावरणप्रेमी रोहन भाटे, नाना खामकर यांच्यासह संबंधित झाडांची जोपासणा करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांनी कराड नगरपालिका अधिकाऱ्यांना गुरूवारी अक्षरश: धारेवर धरले. 

कराड नगरपालिकेने वृक्ष प्राधिकरणाची स्थापना केली असली तरी या प्राधिकारणातील सर्व सदस्यांना विश्वासात न घेता पालिका अधिकाऱ्यांनी सकाळी सातच्या सुमारास ही झाडे काढली. विशेष म्हणजे झाडे काढण्याच्या विषयाला कार्योत्तर मंजुरी घेणार असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर सौरभ पाटील यांच्यासह रिक्षा व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला.

झाडे हटवण्यास विरोध नव्हता, मात्र चुकीच्या कार्यपद्धतीने झाडे काढल्याने आपला विरोध असल्याचेही सौरभ पाटील यांनी यावेळी सांगितले. तर रोहन भाटे, नाना खामकर यांनी झाडांच्या मुळ्या योग्य पद्धतीने काढल्या नसल्याकडे लक्ष वेधत तीव्र नाराजी व्यक्त केली. धक्कादायक बाब म्हणजे वृक्ष प्राधिकरण समितीत समाविष्ट असलेल्या जालिंदर काशीद यांना या प्रकाराची कल्पनाही नव्हती. सप्टेंबर महिन्यात वृक्ष प्राधिकरणाची नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये केवळ चर्चा झाली होती. त्यानंतर एकही बैठक झाली नसल्याचे धक्कादायक माहिती काशीद यावेळी दिली. त्यामुळेच कराड नगरपालिकेच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर नाक्यावरून तोडलेल्या पिंपळ आणि वडाच्या झाडाचे मंगळवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत पुनर्रोपण करण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.