सातारा : प्रतिनिधी
मुंबईतील लोअर परेलमधील अग्नितांडवातून दोनशे जणांची सुटका करणारा देवदूत महेश साबळे याने दैनिक पुढारीच्या कार्यालयास भेट देऊन वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने मुंबईतील लोअर परेल येथील झालेल्या दुर्घटनेबाबतचे भीषण वास्तव पुढारी ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केले.
दैनिक पुढारी आज आपला ७९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करत आहे. त्यानिमित्ताने साबळे याने पुढारीच्या कार्यालयाला भेट देवून शुभेच्छा दिल्या. त्याने यावेळी मुंबईतील लोअर परेल अग्नितांडवाबाबतचा आपला भीषण अनुभव सांगितला. तो म्हणाला, ‘‘ ही आग खूप भयानक होती, अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वांची धावपळ झाली. मी त्याठिकाणी सुरक्षारक्षक मणून काम करतो. यावेळी एका इमारतीत दिडशे ते दोनशे लोक अडकले होते. इमारतीने पुढच्या बाजूने पूर्ण पेट घेतला होता. लोकांना बाहेर येता येत नव्हते. याच इमारतीच्या मागच्या बाजूने एक दरवाजा होता मात्र, त्याची कोणालाच कल्पना नव्हती. माझ्या लक्षात आल्यानंतर लगेच मी त्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि लोकांना बाहेर काढले.’’