Thu, Jul 18, 2019 16:59होमपेज › Satara › फलटणमधून सावकारीचा बाजार कधी उठणार?

फलटणमधून सावकारीचा बाजार कधी उठणार?

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 1:43AMफलटण : यशवंत खलाटे

फलटण शहरासह ग्रामीण भागात अवैध सावकारीने उच्छाद मांडला आहे. सावकारी करणार्‍या संशयितांवर पोलिसांची पकड ढिली झाल्याने झटपट पैसे दुप्पट करण्याच्या मानसिकतेमुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या आठवडाभरात फलटण शहरातील तीन प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दिवसेंदिवस  सावकारी प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या प्रकरणामध्ये राजकीय पदाधिकार्‍यांचाही मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून पोलिस अधीक्षकांनी ज्या प्रमाणे सातार्‍यात कारवाई केली. त्याचप्रमाणे फलटणमध्ये कारवाई करून सावकारीचा बाजार उठवावा, अशी मागणी होऊ लागली आहे. 

सर्वसामान्य नागरिक व शेतकर्‍यांना जास्त पैसे व कमी व्याजाचे अमिष दाखवून लाखो रूपये व्याजावर देऊन दुप्पट, तिप्पट रक्कम उकळली जात आहे. पैसे वेळेत न मिळाल्यास कर्जदाराकडून अपहरण करणे, मारहाण करणे, जबरदस्तीने जमिनी, घरे, प्लॉट, वाहनांवर कब्जा करणे असे प्रकार वाढले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने सावकारी प्रकरणाला जास्त वाचा फुटत नाही. त्यामुळे पोलिसांनीच पुढाकार घेऊन खासगी सावकारांची पाळेमुळे खणून नागरिकांना न्याय द्यावा. यासाठी नागरिकांनीही न भीता तक्रारी देण्यासाठी पुढे आले पाहिजे. 

गेल्या वर्षभराच्या कालावधीत खासगी सावकारी प्रकरणात सातार्‍यातील 10 ते 12 जणांना मोक्का लावण्यात आला आहे. तर 6 महिन्यांपूर्वी फलटण नगरपालिकेचा नगरसेवक सनी अहिवळे याला मोक्का लावला होता. त्यानंतरही परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. मोक्का, टाडा यासारखे अनेक कायदा शासनाने तयार केले आहे. मात्र, कारवाईमध्ये हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी आहेत.

खासगी सावकारीला पोलिसांचेच अभय असल्याने या सावकारांची मुजोरी अधिकच वाढत आहे. या खासगी सावकारांमध्ये राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. तसेच काही व्यापारीही सर्वसामान्यांना 10 ते 40 टक्के व्याजाने रक्कम देतात. 

अनेक लोकांनी अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. तर आख्खी कटुंबेच्या कुटूंबे देशोधडीला लागली आहेत. कित्येक एकर जमिनी पैशाच्या  तगाद्यामुळे गिळंकृत करण्यात आल्या आहेत. जे लोक खायला महाग होते चोर्‍या करत होते. ते आता खासगी सावकार झाल्याने पैसा खुळखूळू लागल्यानंतर आता शेठ, सरपंच, सावकार, नेते आणि भाई झाले आहेत. फलटण तालुक्यात अवैध सावकारकीचा फास निर्माण झाला असून हजारो लोक या सावकारकीच्या फासामुळे अडचणीत आले आहेत. दुप्पट, तिप्पट,चौपट रकमा परत करूनही हे लोक त्यांना त्यांच्या कुटूंबातील लोकांना मानहानीकारक वागणूक देऊन मारहाण करत आहेत. लोकांना सावकारी पाशातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

Tags :  satara, phaltan, money lenders, business