Tue, Jun 02, 2020 00:27
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पाटणमध्ये मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क नो ‘नीट वर्क ’

पाटणमध्ये मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क नो ‘नीट वर्क ’

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 9:06PM

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्यात मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना अक्षरशः सर्वच पातळ्यांवर मेटाकुटीला आणले आहे. स्थानिक कर अथवा शासकीय महसूल बुडविण्यासाठी एकाच टॉवरवर चार चार कंपन्यांचा संसार चालू आहे. कंपन्यांच्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यन्त कोठेही तक्रार केली तरी ’ व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी ’ ... चे प्रत्यंतर अनुभवायला मिळत आहे. निश्‍चितच संतप्त ग्राहक आता ’खळळ् खट्याक’च्या  तयारीत असल्याने संबंधित कंपन्यांनी हा असंतोष लक्षात घेता आपल्या सेवात सुधारणा करण्याची गरज आहे. 

पाटण तालुक्यात सध्या अनेक नामांकित कंपन्यांच्या मोबाईल सेवा कार्यरत आहेत. मात्र यापैकी अपवाद वगळता बहूतेक कंपन्यांच्या सेवेचा येथे पूरता फज्जा उडाला आहे. ज्या पटीत या कंपन्या अथवा त्यांचे कार्यक्षेत्र आहे त्याचपटीत संबंधित कंपन्यांचे टॉवर नाहीत. तर त्या टॉवरवरची ग्राहक क्षमता न लक्षात घेता त्यापेक्षा कितीतरी पटीने ज्यादा ग्राहक झाल्याने मग संबंधित सेवेवर विपरीत परिणाम झाले आहेत. एका बाजूला सेवेची बोंबाबोंब असली तरी दुसरीकडे मात्र बिलापोटी भरमसाठ रक्कमांनी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा उद्योग येथे राजरोसपणे सुरू आहे.

कित्येकदा रेंजच गायब असते, रेंज असेलतर लाइन व्यस्त असतात त्यामुळे बराचकाळ कॉल लागत नाही. मधूनच नेटवर्क गायब होते नाहीतर कॉलमध्ये कंजेक्शन ठरलेलेच. यातूनही नशीब बलवत्तर असेलच तर कॉल लागतो याचे समाधान घेण्यापूर्वीच तो बंदही पडतो. कंपनीच्या भाषेत हा कॉल ड्रॉप असला तरी त्यासाठीचे पैसे क्षणार्धात गायबही करण्याचा चमत्कार त्या कंपनीने केलेला असतो.

तर चुकून बोलणे सुरू झालेच तर मग एकतर्फी प्रेमाप्रमाणेच हे एकतर्फी संभाषण होते. पण आशावादी मनुष्यप्राणी असल्याने निदान पुढच्या कॉलमध्ये संभाषण होईल या अपेक्षेने कॉलवर कॉल करतच राहतो मात्र एकाबाजूला त्याचा व मोबाईलमधला बॅलन्स जातो पण संभाषण होतच नाही अशाच बहुतेक तक्रारी आहेत. यासोबतच इंटरनेट सेवामधील अवस्थाही यापेक्षा दयनीय झाली आहे.