Fri, Jul 19, 2019 22:41होमपेज › Satara › औंध यात्रेत जनावरांची लाखोंची उलाढाल

औंध यात्रेत जनावरांची लाखोंची उलाढाल

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 8:42PM

बुकमार्क करा
औंध : वार्ताहर

औंध येथील श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त औंध ग्रामपंचायत, ग्रामस्थ, यात्रा कमिटी व कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने औंध-पुसेगाव व औंध-खबालवाडी रस्त्यावर जनावरांचा बैल बाजार भरविण्यात आला आहे. यंदा जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला असून यात्रेमध्ये सुमारे 15 हजार जनावरे दाखल झाली आहेत. मागील तीन दिवसांपासून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. दरम्यान यंदा शनिवार (दि.13) रोजी सकाळी दहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत खिलार जनावरांचे भव्य प्रदर्शन भरविले जाणार आहे, अशी माहिती  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद सावंत यांनी दिली.

औंधच्या बैल बाजारास एक वेगळे महत्त्व आहे. सुमारे दहा ते पंधरा दिवस हा बैलबाजार यात्रेनिमित्त भरविला जातो. यात्रेनिमित्त येणार्‍या शेतकरी  तसेच जनावरांना सर्व प्रकारच्या सुविधा जारसमितीच्यावतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. औंध यात्रेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण,  आंध्र, तेलंग राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी  दाखल झाले आहेत.   यात्रेमध्ये विविध प्रकारची जातीवंत खिल्लार जनावरे, कर्नाटकातून कोशा, गौळाऊ, देवणी प्रकारची जनावरे, खरसुंडी, आटपाडी, माणदेशी खिल्लार जनावरे औंध यात्रेत आली आहेत. 

मागील चार वर्षाच्या तुलनेत उलाढाल चांगली असून शेतकरी,  व्यापारी वर्गामध्ये खरेदी विक्रीसाठी उत्साह आहे. यात्रा काळात जनावरांना कोणत्याही प्रकारच्या रोगाचा आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन अधिकारी यु.डी.मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. 

श्रीयमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्‍वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सी.एम.पाटील, उपसभापती ज्ञानेश्‍वर जाधव,सर्व संचालक, सचिव शरद सावंत, एस. व्ही. सर्वगोड, विजय गोडसे, एस.जी. कांबळ आदी बाजार यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.