Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Satara › कराडः दूध भेसळप्रकरणी डेअरीवर कारवाई

कराडः दूध भेसळप्रकरणी डेअरीवर कारवाई

Published On: Sep 09 2018 11:43AM | Last Updated: Sep 09 2018 10:28PMकराड ः प्रतिनिधी

दुधात भेसळ करणार्‍या शेरे (ता. कराड) येथील शिवमिल्क प्रॉडक्ट दूध डेअरीवर छापा टाकून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या छाप्यात पोलिसांनी दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारा युरिया, निरमा, गोडेतेल, पावडर व मिक्सर आदी जप्त करून डेेेअरी सील केली आहेे. 

डेअरी मालक सयाजी मुरलीधर निकम याच्यासह संतोष सर्जेराव निकम, वैभव माणिकराव निकम व सूरज संपत निकम (सर्व रा. शेरे, ता. कराड) अशी पोलिसांनी गुन्हा नोंद केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी 40 लिटरचे 30 कॅन दूध, अर्धा पोते युरिया, सूर्यफूल गोडेतेलाचे तीन डबे, निरमा पावडर पुडा व दोन मिक्सर असे साहित्य जप्त केले आहे. डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अन्न भेसळ विभागाच्या मदतीने शनिवारी रात्री ही कारवाई केली. यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

डीवायएसपी ढवळे म्हणाले की, शेरे येथे एका दूध डेअरीत दुधभेसळ होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही संबंधित दूध डेअरीवर शनिवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, उपनिरीक्षक राठोड यांच्यासह फौजफाटा घेऊन आम्ही छापा टाकला. त्याचवेळी तेथून छोटा हत्ती वाहनातून (एम एच 50, 5909) दुधाचे कॅन व प्लॅस्टिकची 10 पोती घेऊन एकजण निघालेला दिसला. त्याला थांबवून नाव विचारले असता संतोष सर्जेराव निकम (वय 29 ) असे सांगितले. शिवमिल्क प्रोडक्ट्स येथून दूध आणल्याचे त्यांने सांगितले. वाहनातील पोत्यात दुधाचे फॅट वाढविण्यासाठी टाकण्याची पावडर असल्याचे व टेम्पोतील दूध विक्रीसाठी कोयना दूध डेअरी, खोडशी येथे घेऊन निघाल्याचेही संतोष निकम याने सांगितले. 

उपनिरीक्षक राठोड यांनी सातारा येथील अन्नसुरक्षा अधिकारी ए. ए. पवार यांना फोनवरून वरील हकीकत सांगून शिव मिल्क प्रॉडक्ट्स शेरे येथे येण्यास सांगितले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांना घेऊन पोलिस डेअरीमध्ये गेले. तेथे वैभव माणिकराव निकम व सुरज संपत निकम होते. ही डेअरी सयाजी निकम यांच्या मालकीची असून आम्ही या डेअरीत कामास आहोत, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. 

अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या पाहणीत डेअरीत युरीयाचे अर्धा पोते, सूर्यफूल गोडेतेलाचा डबा, धुण्याचा सोडा व दोन मिक्सर दिसले. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी हे साहित्य व पदार्थ येथे ठेवल्याचे संतोष निकमने  पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी संतोष निकम याच्याकडून बाराशे लिटर दुधाचे तीस कॅन व स्प्रेड्र्ाईड टी कॉफी मिक्स कंपनी पावडरीची प्रत्येकी 25 किलोंची दहा पोती तसेच डेअरीत तीन डबे सूर्यफूल गोडेतेल, निरमा पावडर पुडा, अर्धे पोते युरिया, दोन मिक्सर असे साहित्य व पदार्थ पोलिसांनी जप्त केले.