Fri, Jul 19, 2019 18:01होमपेज › Satara › ‘बिसलेरी’पेक्षा दूध  स्वस्त...

‘बिसलेरी’पेक्षा दूध  स्वस्त...

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:53PM
सातारा : सुनिल क्षीरसागर

शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जात आहे. मात्र, दुध संघाचा मनमानीपणा आणि शासनाची कुचकामी धोरणे यामुळे दूधाचे दर कोसळले आहेत. सध्याच्या घडीला 15 ते 17 रूपये लिटर असा दूधाचा दर सुरू आहे. त्याच तुलनेत पाण्याची बाटली मात्र 20 रूपयांना विकली जात आहे. त्यामुळे बिसलेरीपेक्षा दुध स्वस्त असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. 

ऊस दरात एफआरपीचा प्रश्‍न तर  शेतीस जोड व्यवसाय म्हणून ओळखले जाणार्‍या दूध व्यवसायाला दराचे ग्रहण अशी  व्दिधा अवस्था शेतकर्‍याची झाली आहे. शेतकर्‍याला उभारी देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने विविध योजना आणल्या, गायी, म्हैशी खरेदीसाठी कर्जे दिली, गोठे दिले, दुधाची गुणवत्‍ता व घटक तपासणीचे  कोणतेही विश्‍वसनीय  व सरकारी परिमाप म्हणून  फॅट मशीनकडे पाहिले जाते. अशा फॅट मशीन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र  या मशीनची सरकारी तपासणी करणारी यंत्रणा आहे का? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे खाजगी दूध डेअर्‍या व संघाचा मनमानी वाढला आहे.

शेतकर्‍याला आता दूध दरासाठी संघर्ष करावा लागत आहे.  दुधाला पाण्यापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला  आहे. गायी, म्हैशीच्या  दुधाची  फॅट मारण्याचा नवीन फंडाच खाजगी डेअर्‍या व संघांनी शोधला आहे.   फॅट मशीनमध्ये सेटींग करत फॅट मारण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. पिकाला वाजवी दर नाही, चांगली बाजारपेठ नाही, बाजारपेठ असेल तर त्याला स्वतःचा शेतमाल स्वतः विकता येत नाही. या- ना त्या अशा  अनेक समस्यांनी शेतकरी पुरता हैराण झाला आहे. 

दुधामध्ये पाणी, स्निग्धांश म्हणजे फॅट, प्रथिने शर्करा, खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे  हे  वेगवेगळे घटक असतात. या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्वाचा घटक आहे. दुधाचा स्वाद हा सुध्दा बर्‍याच प्रमाणात दुधातील स्निग्धांशावर अवलंबून असतो. दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी  व त्यांचा दर्जा  उत्‍तम राखण्यासाठी दुधातील स्निग्धांशास महत्व आहे. त्यामुळे फॅट मशीनला महत्व आहे. दुधाची फॅट तपासून दुधातील घटकांच्या प्रमाणावर दुध उत्पादकांना दुधाचा मोबदला दिला जातो.

मात्र, फॅट मशीनमध्ये सेटींग करून  दुधाची फॅट मारण्याचा धंदाच खाजगी डेअरी व संघांनी सुरू केला आहे. 2 ते 3 पाईंटची फॅट राजरोसपणे मारली जात आहे. फॅट मशीन खरेदी करतेवेळीच त्यात सेटींग करून घेतले जात असल्याचेही बोलले जात आहे तर  या मशीनच्या दुरूस्तीच्या नावाखालीसुध्दा हा काळाबाजार केला जात आहे. बहुतांश वेळी गावातील वेगवेगळ्या खाजगी डेअर्‍या व दुग्ध संघात एकाच प्रकारच्या दुधाची वेगवेगळी फॅट मिळते त्यानुसार आपल्या सोईनुसार दुध उत्पादकाच्या दुधाला  दर दिला जात आहे. त्यामुळे दूध व्यवसायातील विश्‍वासार्हता धोक्यात आली आहे.  

शासनाने या प्रकरणी लक्ष घालून दुधाच्या गुणवत्‍तेवर आधारीत दर देण्यासाठी पारदर्शक व विश्‍वासार्ह फॅट मशीन देणे व त्याची तपासणी करणारी अद्यावत यंत्रणा उभारणीची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.